आगरदांडा : मुरूड तालुक्यातील एकदरा गावातील दोन शाळकरी मुलांना काही तृतीयपंथी लोकांनी तोंडावर हात ठेवून जबरदस्तीने व्हॅनमध्ये कोंबून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा बनाव रचण्यात आला होता. परंतु मुरूड पोलीस ठाण्याचे साहाय्य्क पोलीस निरीक्षक विनोद तांबोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी व शोध घेतल्यावर हे प्रकरण बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती साहाय्य्क पोलीस निरीक्षक विनोद तांबोळी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या वेळी त्यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ उपस्थित होते.‘शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण’ ही बातमी विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यात या प्रकारामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली होती. जो तो पालक आपल्या मुलाची काळजी घेताना दिसत होता. या प्रकरणाची गंभीर दखल रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी स्वत: घेऊन पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन जाधव व गुन्हे अन्वेषण खात्याच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची उकल करण्यासाठी पाठविण्यात आले होते.या प्रकरणाचा तपास करताना प्रथम आम्ही तृतीय पंथी लोकांचा कसून तपास केला, त्या वेळी आमच्या लक्षात आले की, मुरूड शहर व काही ग्रामीण भागात तृतीय पंथी लोक हे आठवड्यातून ठरावीक वाराला येत असतात. ते ज्या वाराला येतात त्या वाराला ही घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाले. मग पथकाने व्हॅनचा शोध घेण्याचे ठरविले, ही घटना सकाळी सातची असल्याने आम्ही मुरूड - अलिबाग या मुख्य रस्त्यावर असणाºया विविध शाळा अथवा ग्रामपंचायत शाळा यांचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्याची मोहीम हाती घेतली; परंतु या वेळेत कोणतीही व्हॅन गेली नसल्याचे स्पष्ट झाल्याने पुन्हा तपास शालेय विद्यार्थी यांच्याकडे वळविण्यात आल्याची माहिती तांबोळी यांनी दिली.या लहान मुलांना व त्यांच्या आई-वडिलांना विश्वासात घेऊन सिव्हिल ड्रेसमध्ये प्रेमाने व आपुलकीने चौकशी करण्यात आली. त्या वेळी या दोन शाळकरी विद्यार्थ्यांनी पोलिसांना शाळेत जाण्यास उशीर झाला होता व शाळेचा कंटाळा आला असल्याने आम्ही आमच्या आई-वडिलांना सर्व खोटे सांगितल्याचे कबूल के ले. त्यामुळे हे अपहरण बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे.अपहरणाचे प्रकरण बोगस असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आता कोणीही या प्रकरणाची अफवा पसरवू नये; अन्यथा आम्हाला त्या व्यक्तीवर कडक कार्यवाही करावी लागेल. या प्रकरणामुळे मुरूड पोलीस सतर्क झाले असून तृतीयपंथी लोकांवर कडक नजर ठेवणे, त्याचप्रमाणे रात्रीच्या गस्तीवर अधिक लक्ष केंद्रित करून जो कोणी संशयित आढळेल त्याला पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. अफवा पसरवू नये, असे आवाहन साहाय्यक पोलीस निरीक्षक तांबोळी यांनी के ले आहे.
विद्यार्थ्यांनीच रचला होता मुरूडमधील अपहरणाचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:11 PM