भाजपाच्या सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली- अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 03:00 AM2017-11-05T03:00:11+5:302017-11-05T03:00:41+5:30
महात्मा गांधींना १९४२मध्ये ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’ची घोषणा द्यावी लागली, तशीच घोषणा देत, आता भाजपाच्या सरकारला देशातून आणि राज्यातून ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे.
महाड : महात्मा गांधींना १९४२मध्ये ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’ची घोषणा द्यावी लागली, तशीच घोषणा देत, आता भाजपाच्या सरकारला देशातून आणि राज्यातून ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे. ‘मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे’, ‘अच्छे दिन लायेंगे, लेकीन तारीख नही बतायेंगे’ असेच या सरकारचे धोरण आहे. मात्र, आपण सर्वांनी २०१९ हे वर्ष लक्षात ठेवायचे आहे. आम्ही तुमच्या मागे उभे राहू, तुम्ही जनतेच्या मागे ठामपणे उभे राहा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी महाड येथे कार्यकर्त्यांना केले.
सरकारच्या जनहितविरोधी धोरणांच्या निषेधासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महाड येथे शनिवारी जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. या सभेला काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खा. हुसेन दलवाई, माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप, आमदार शरद रणपिसे, आमदार हुस्नबानू खलपे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माणिकराव जगताप, माजी आमदार मधूशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी देशातील सरकार हे शेतकºयांचे, कष्टकºयांचे, आदिवासींचे, दीन-दलितांचे सरकार नाही, तर ते केवळ भांडवलदारांचे हित पाहणारे सरकार आहे. देशातील सर्वसामान्य माणसाचे भले झाले आहे, असा एकही निर्णय गेल्या तीन-साडेतीन वर्षांच्या काळात केंद्र सरकारने घेतलेला नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये एकत्र आहेत, पण त्यांचे पटत नाही. पटत नाही, तरीही एकत्र आहेत. कारण ‘झगडा करेंगे, लेकीन मलाई भी खायेंगे’ असेच त्यांचे धोरण असल्याची टीकाही त्यांनी केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सरकार बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तालावर चालत असल्याचा आरोप केला. शेतमालाला भाव मिळत नाही, स्वामिनाथन आयोग भांडवलदारांच्या दबावापोटी लागू केला जात नाही, दोन कोटी नवे रोजगार निर्माण करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात नोकºया जाण्याची वेळ आली आहे. नोटाबंदी आणि त्यानंतरच्या जीएसटीने देशाच्या अर्थव्यवस्थेवर दुहेरी हल्ला चढविला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.