अलिबाग : एक लाख ९० हजार रुपयांची लाच घेणारा माणगाव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा उप अभियंता विकास जाधव याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कल्याण येथील राहत्या घरी झडती सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक यास्मीन इनामदार यांनी दिली.राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत माणगाव तालुक्यातील तळाशेत येथे नळ पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आनंद कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले होते. सुमारे चार कोटी ४१ लाख ६१ हजार २०० रुपयांची ही योजना होती. कंपनीच्या उप कंत्राटदाराच्या नावाने ६० लाख रुपयांचे पहिल्या हप्त्याचे बिल निघणार होते. याबाबत तक्रारदार विकास जाधव याला भेटण्यासाठी गेले. बिल मंजूर करण्यासाठी जाधव याने दोन लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. बिल मंजूर होणार नाही, या भीतीने तक्रारदाराने ५० हजार आगाऊ रक्कम म्हणून दिली. उर्वरित दोन लाख रुपये देत नाही तोपर्यंत पुढील बिल मंजूर करणार नाही, असे जाधव याने तक्रारदाराला सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी एक लाख ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जाधव यावा रंगेहाथ पकडले. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
जाधवला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
By admin | Published: April 03, 2016 3:51 AM