‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:40 AM2018-02-20T01:40:17+5:302018-02-20T01:40:30+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८८ वी जयंती रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाभरात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्र मांचे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८८ वी जयंती रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाभरात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी ध्वनिक्षेपकावर सुरू असलेले पोवाडे आणि जागोजागी फडकत असलेले भगवे झेंडे यामुळे सर्वत्र शिवकालीन वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. भगवे फेटे, सफेद कुर्ता, कपाळी अर्ध चंद्रकोर असा वेश परिधान तरु ण ‘जय शिवराय’च्या घोषणा देत होते. त्यामुळे परिसर चांगलाच दुमदुमून गेला.
अलिबाग : अलिबागमध्ये मावळा प्रतिष्ठानच्या वतीने शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने शिवराज्याभिषेकावर आधारित चलचित्र साकारून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये रथात बसलेले बाल शिवाजी, मावळे रथयात्रेची शोभा वाढवत होते. दुसºया रथामध्ये शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. ढोल-ताशाच्या गजरात तरु णाई मंत्रमुग्ध झाली होती.
शहरातील ब्राह्मण आळी येथील राममंदिरातून या मिरवणुकीस सुरु वात झाली. महावीर चौक, शेतकरी भवन, ठिकरूळ नाका त्यानंतर शिवाजी चौकात मिरवणुकीची सांगता झाली. शिवप्रेमींनी त्यानंतर दांड पट्टा - मल्लखांब अशा विविध खेळाची प्रात्यक्षिके सादर केल्याने शिवजयंती उत्सवाची चांगलीच रंगत वाढवली.
अलिबाग नगर परिषदेच्या वतीने शिवरायांना अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, वृषाली ठोसर, चित्रलेखा पाटील, अॅॅड. गौतम पाटील यांनी अश्वारूढ शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. जिल्हाभरात शिवजयंतीचा जल्लोष सुरू होता. सकाळी तसेच सायंकाळी शिवप्रतिमांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. रात्री शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.
शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
मोहोपाडा : रसायनी परिसरात ठिकठिकाणी ३८८ वी शिवजयंती उत्सव सकाळपासूनच उत्साहात साजरा करण्यात आला. चांभार्ली, मोहोपाडा, वावेघर, कैरे, वाशिवली आदी परिसर शिवराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. रिस कांबे येथे परिसर स्वच्छ करून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. समाजसेवक प्रकाश गायकवाड यांच्याहस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून शिवध्वज फडकविण्यात आला. एचओसी कॉलनीतील शिवपुतळा परिसराची तरु णांनी साफसफाई करून रंगरंगोटी केली. चांभार्ली थांब्यावर विद्यार्थ्यांनी झांज पथकाच्या तालावर मिरवणूक काढली. मोहोपाडा शिवाजी चौकात शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपतींच्या नामाचा जयघोष
माथेरान : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती माथेरानमध्ये मोठ्या उत्साहात, छत्रपतींच्या नामाचा जयघोष करीत आनंदाने साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपतींच्या अर्धपुतळ्याला विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नौरोजी उद्यानातील हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्याला नगरसेवक राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते तर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्तंभास नगरसेविका वर्षा रॉड्रीक्स आणि ऋ तुजा प्रधान यांनी पुष्पहार अर्पण केला.
कर्जतमध्ये शिवज्योत दौड
कर्जत : शिवराज प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. डेक्कन जिमखाना येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शिवज्योत दौड, किल्ले भिवगड ते कर्जत शिवस्मारक अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर पुतळ्याजवळ शिवआरती करण्यात आली.
आचारसंहितेचे सावट
नागोठणे : ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच प्रणय डोके, उपसरपंच शैलेंद्र देशपांडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त आचारसंहिता लागली असल्याने त्याचे सावट शिवजयंतीवर आले असल्याचे ग्रा. पं. सदस्यांच्या अनुपस्थितीवरून दिसून आले होते.