बराल पती-पत्नीला गाडीखाली चिरडून पलायन केलेल्या आरोपी जय घरत याला अखेर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 06:11 PM2024-05-01T18:11:53+5:302024-05-01T18:12:05+5:30
उरण रेल्वे स्टेशनसमोरच मागील महिन्यात पवित्रा, रश्मिता हे बराल दांपत्य आणि मुलगी परी बराल यांच्या स्कुटीला क्रेटा कारने चिरडून आरोपी जय दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला होता.
मधुकर ठाकूर
उरण : पनवेल सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्याने ,उच्च न्यायालयातही जामीन अर्ज मागे घेण्याच्या नामुष्कीची पाळी आल्यानंतर आणि विविध सामाजिक संस्थांच्या पोलिसांवरील वाढत्या दबावतंत्रानंतर उरणमधील अत्यंत संवेदनशील बनलेल्या बराल पती-पत्नी अपघात प्रकणातील आरोपी जय चंद्रहास घरत याला पोलिसांनी उरण परिसरातून अटक केली आहे.न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी डॉ.विशाल नेहूल यांनी दिली.
उरण रेल्वे स्टेशनसमोरच मागील महिन्यात पवित्रा, रश्मिता हे बराल दांपत्य आणि मुलगी परी बराल यांच्या स्कुटीला क्रेटा कारने चिरडून आरोपी जय दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला होता. अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी मदतीसाठी धाऊन आलेल्या आरसीएफ जवान अतुल चौहान यांनाही उद्दामपणाने अश्लील भाषेत शिवीगाळ, मारहाण करून भाजपा आमदार महेश बालदी यांचे निकटवर्ती चंद्रहास घरत यांचा आरोपी मुलगा जय हा घटनास्थळावरूनच वाहतूक पोलीसांच्या उपस्थितीतच परिचित सहकाऱ्यांच्या मदतीने दुचाकीवरून फरार झाला आणि उपचाराच्या नावाखाली उलव्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाला होता.दरम्यान भाजपा आमदार महेश बालदी यांचे निकटवर्ती चंद्रहास घरत यांचा आरोपी हा मुलगा असल्यानेच उरण पोलिस कारवाई करण्यात चालढकलपणा करीत असल्याची गंभीर आरोप करताना उरण- पनवेलमधील काही सामाजिक संघटनांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन
आरोपीला अटक करून कारवाई करण्याची मागणी केली होती.मागणीचा सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावाही केला.
दरम्यान आरोपीने जामीनासाठी दाखल केलेल्या अर्जाला पोलिसांनी कडाडून विरोध केला.यामुळे पनवेल सत्र न्यायालयाने आरोपींचा अर्ज फेटाळून
लावला.त्यानंतर उच्च न्यायालयातही दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज आरोपीच्या वकिलांनी मागे घेण्याची नामुष्की ओढवली.त्यामुळे पोलिसांचा आरोपीला अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर बुधवारी (१) सकाळी ८ वाजता उरण पोलिसांनी आरोपी जय घरत याला उरणमधुन अटक केली.न्यायालयानेही आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी डॉ.विशाल नेहूल यांनी दिली.