- शरद निकुंभ ।पाली : पाली-खोपोली महामार्गावरील (५४८ अ) जांभुळपाडा धोकादायक पुलाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी लय भारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा लता कळंबे यांनी उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या सहाव्या दिवशी रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. जांभुळपाडा धोकादायक पुलाची पाहणी करून लवकरच पुलाची दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम सुरू केले जाणार असल्याचे लेखी पत्र या वेळी उपोषणकर्त्यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले, उपअभियंता दिलीप साळवी, पाली पोलीस निरीक्षक दशरथ पाटील व उपोषणकर्त्यांनी शनिवारी विस्तृतपणे चर्चा केली.लेखी पत्राच्या आश्वासनानंतर लय भारी आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष प्रशांत लाड यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या कार्याध्यक्षा तथा उपोषणकर्त्या लता कळंबे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण सहाव्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आलेल्या लेखी पत्राद्वारे उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबतचे ठोस आश्वासन देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या पत्राद्वारे जांभुळपाडा पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केलेला असून, सदर कामाची मंजुरी मिळताच काम हाती घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. या वेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले, उपअभियंता दिलीप साळवी, पाली पोलीस निरीक्षक दशरथ पाटील आदींसह चिवे आदिवासीवाडी ग्रामस्थ, चिवे ग्रामस्थ, जांभुळपाडा ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.आमरण उपोषणास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, मंगळवार, १२ सप्टेंबरपासून पूल दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास उपोषण पुन्हा सुरू करण्यात येईल. वेळप्रसंगी या प्रश्नावर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.- लता कळंबे,उपोषणकर्त्याजांभुळपाडा पुलाच्या दुरुस्तीसाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला सोमवार, ११ सप्टेंबर रोजी रीतसर पत्र दिले जाणार आहे. त्यानंतर पुलाचे काम सुरू होईल.- विवेक नवले, अधीक्षक,रस्ते विकास महामंडळपुलाच्या दुरु स्तीबाबत अधीक्षक अभियंता मोहिते यांच्याकडून जांभुळपाडा पूल दुरु स्ती करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. सोमवारनंतर कामाला सुरुवात केली जाईल. जांभुळपाडा पुलावरून वाहतुकीचा वेग कमी करण्याकरिता पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधक बसविण्यात येणार आहेत. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला पुलाची लांबी, रुंदी व क्षमता याबाबत फलक लावले जाणार आहेत- संदीप चव्हाण,उपअभियंता,बांधकाम विभाग
जांभुळपाडा पुलाची लवकरच दुरूस्ती, रस्ते विकास महामंडळाचे लेखी आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 5:16 AM