रायगड: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात शिवस्वराज्य यात्रा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीची ही यात्रा आज (गुरुवारी) रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये पोहचली असून यावेळी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी भाजपाच्या महाजनादेश यात्रा आणि शिवसेनेची जनआशिर्वाद यात्रेवर टीका केली आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, भाजपाच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मात्र पाच वर्षात जनतेची कामं केली असती तर 15 फुटांवर उभं राहून रस्त्यांवर लोकं नसतील तरी हात दाखवायची वेळ आली नसती आणि सभेत मी पुन्हा येईन असे बोलायला लागले नसते असं म्हणत अमोल कोल्हेंनी भाजपाच्या महाजनादेश यात्रेवर टीका केली आहे.
तसेच शिवसेनेच्या जनआशिर्वाद यात्रेवर टीका करत म्हणाले की, जनआशिर्वाद यात्रेमध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वारंवार सांगतात की मी फक्त जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. मात्र काहीजण सांगत आहेत की ह्यांनाच मुख्यमंत्री करा, त्यामुळे जनआशिर्वाद यात्रा म्हणजे केवळ स्वार्थाची जत्रा असं म्हणत शिवसेनेच्या जनआशिर्वाद यात्रेवर अमोल कोल्हेंनी टोला लगावला आहे.
दरम्यान अमोल कोल्हेंनी याआधी देखील राज्य सरकारच्या जाहीरातींवर टीका करत महाराष्ट शासन न केलेली काम तुमच्या आमच्या माथी मारण्यासाठी राज्य सरकार दिवसातील चार तासांसाठी तुमच्या आमच्या खिशातील जवळपास २० ते २२ लाख रुपये हे जाहिरातींवर खर्च करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकाराची प्रत्येकी तासाला 10 जाहिराती दाखविली जाते, एक जाहिरातीसाठी साधरणत: 12 हजार रुपये इतका खर्च करवा लागतो. त्यामुळे राज्य सरकार दिवसातील चार तासांसाठी तुमच्या आमच्या खिशातील जवळपास २० ते २२ लाख रुपये हे जाहिरातींवर खर्च करत असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. त्याचप्रमाणे 2014च्या निवडणुकीनंतर समजले की पूर्वी आई- वडिल सांगायचे जाहिराती बघून तेल आणि साबण यांच्यासारख्या वस्तू निवडायच्या असतात सरकार निवडायचे नसते, असं म्हणत टीका केली होती.