जनार्दन पाटील यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
By admin | Published: February 14, 2017 04:56 AM2017-02-14T04:56:22+5:302017-02-14T04:56:22+5:30
अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष जनार्दन पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी अलिबाग
अलिबाग : अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष जनार्दन पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी अलिबाग तालुक्यातील चेंढरे पंचायत समिती गणातून आपला उमेदवारी अर्ज देखील मागे घेतला आहे. त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी भाग पाडल्याचा आरोप जनार्दन पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्नी सुलभा पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळाली मात्र शेकापने देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पाटील यांची राजकीय गोची झाली होती. शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे, असे असताना दोन्ही पक्षाने उमेदवार दिल्याने पेच निर्माण झाला होता. शेकापने प्रचाराला सुरुवातही केली होती. याबाबत तटकरे यांनी सांगितले होते मात्र त्यांना शेकापला रोखता आले नाही, असे पाटील यांनी सांगितले. प्रचार साहित्य तयार केले होते परंतु उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शेकापने माघार घेतली नाही. त्यामुळे पक्ष आणि पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही नेत्यांच्या राजकीय डावपेचामध्ये कार्यकर्त्यांचा बळी गेल्याचेही त्यांनी स्पष्ट करुन शिवसेना-काँग्रेसच्या बाजूने प्रचार करणार असल्याचे पाटील म्हणाले.