मुरुड : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावरील वाहतूक महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने गुरुवारपासून बंद केली आहे. त्यामुळे शेकडो पर्यटक नाराज होऊन माघारी परतत होते. या वेळी पर्यटकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
नियमांचे उल्लंघन केल्यामुळे राजपुरी जेट्टीवरून शिडाच्या बोटी बंद करण्यात आल्याचे महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून सांगण्यात आले. प्रत्येक बोटीला ठरावीक प्रवासी क्षमता असताना अतिरिक्त प्रवासी घेऊन जातात. तसेच प्रत्येक प्रवासी वर्गाने लाइफ जॅकेट घालणे बंधनकारक असताना हा नियमसुद्धा पाळला जात नसल्याने अखेर सर्व बोटी बंद करण्यात आल्याचे सांगितले. याबाबत आपली भूमिका मांडताना जंजिरा जल वाहतूक पर्यटक संस्थेचे चेरमन इस्माईल आदमने व व्यवस्थापक नाझभाई कादरी यांनी सांगितले की, जंजिरा किल्ला पाहण्यासाठी लोक हजारोच्या संख्येने राजपुरी येथे येतात. वाढती गर्दी लक्षात घेता बोटींमधून जास्त पर्यटक किल्ल्यावर लवकर जाण्यासाठी व त्यांचा वेळ जाऊ नये, यासाठी जास्त संख्येने जरी पर्यटक नेत असतो, यासाठी बोर्डाने त्यांचा माणूस नियुक्त करून यामध्ये सुसूत्रता आणावी. १९७७ पासून आमची संस्था जंजिरा किल्ल्यावर ने-आण करण्याचे काम करीत आहे. एवढ्या वर्षात या ठिकाणी कोणताही अपघात घडलेला नाही. आम्ही पर्यटकांची व्यवस्थित काळजी घेत आहोत. आमच्याकडून काही चूक झाली तेव्हा आम्हाला दंडसुद्धा आकारलेला आहे; परंतु अचानकपणे बोटी बंद करून शेकडो पर्यटकांची गैरसोय के ली.आमच्या प्रत्येक बोटीमध्ये लाइफ जॅकेट आहेत; परंतु पर्यटक आपले कपडे खराब होतील म्हणून लाइफ जॅकेट घालत नाहीत. त्याला संस्था कशी जबाबदार ठरू शकते, असा सवाल करून यासाठी बोर्डाने अंमलबजावणी करावी, आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत, अशी भूमिका या वेळी त्यांनी स्पष्ट केली. प्रादेशिक बंदर अधिकारी यांनी घेतलेली भूमिका बोटचालकांना पटलेली नसून सागरी आंदोलनाच्या माध्यमातून सर्व बोटधारक येथे उतरणार असून, या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून जंजिरा किल्ल्यावर बोट सुरू कराव्यात, अशी पर्यटक व नागरिक मागणी करीत आहेत.
विजय गिदी यांचा आंदोलनाचा इशाराया वेळी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ मुंबईचे संचालक व राजपुरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय गिदी यांनी महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना जर येत्या तीन दिवसांच्या आत बोटी सुरू केल्या नाहीत तर सर्व शिडांच्या बोटीचे चालक-मालक आपल्या कुटुंबासह सागरी आंदोलन करतील, असा इशारा दिला.
बेकारीला कंटाळून जर एखाद्या बोटचालकाने भर समुद्रात उडी घेऊन आपले जीवन संपवले तर याची सर्वस्वी जबाबदारी मेरी टाइम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन अजित टोपोनो यांची असेल, असे ते म्हणाले. सर्व बोटधारक लवकरच आंदोलनास सुरुवात करणार असल्याचे या वेळी विजय गिदी यांनी सांगितले.
राजपुरी येथील बोटचालकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. प्रवासी क्षमता कमी असताना जास्त प्रवासी नेणे त्याचप्रमाणे लाइफ जॅकेटचे वाटप न करणे, यामुळे तत्काळ बोटी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.- अजित टोपोनो, प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड