जंजिरा किल्ला पर्यटकांना बंद, दरवर्षी ५ लाखांपेक्षा अधिक पर्यटक येतात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 10:26 AM2022-05-26T10:26:06+5:302022-05-26T10:26:52+5:30
ढगाळ वातावरणासह समुद्रातील लाटांच्या पार्श्वभूमीवर निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरुड जंजिरा : पावसाळा जवळ आल्याने ढगाळ वातावरणासोबत समुद्रात वाढणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना कोणताही धोका पोहचू नये, यासाठी आजपासून पुरातत्व खात्याने जंजिरा किल्ला बंद करण्याची घोषणा केली आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी प्रवेश द्वाराजवळ उतरताना प्रवाशांची होणारी कसरत लक्षात घेता सुरक्षिततेच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी ५ लाखांपेक्षा अधिक पर्यटक येत असतात. पर्यटकांमुळेच येथील बोटचालक, लॉन्च मालकांचा उदरनिर्वाह होत असतो. गेल्या वर्षी कोरोनाकाळात जंजिरा किल्ला फार कमी कालावधीसाठी सुरू ठेवण्यात आला होता. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किल्ला सुरू करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिकांना रोजगारासाठी फारच अल्प व्यवसाय मिळाला होता.
परंतु आता पावसाळी हंगामासाठी जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती पुरातत्व खात्याचे अधिकारी बजरंग ऐलीकर यांनी दिली आहे.
वातावरणातील बदलांचे कारण
मुरुडचा सुप्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग आजपासून पर्यटकांना पाहण्यासाठी बंद करण्यात येणार आहे.
उन्हाळी सुट्टी असल्याने जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत.
परंतु, मोठ्या लाटा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी धडकत असल्यामुळे किल्ला बंद करण्यात आला आहे.