मुरूड जंजिरा : ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्टÑासह देश-विदेशातून लाखो पर्यटकांची वर्षभर मुरूडमध्ये वर्दळ असते. हा किल्ला पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत असून, त्याची देखभाल व दुरुस्ती या खात्यामार्फत केली जात आहे. मात्र पावसाळ्यात १ जून ते ३० आॅगस्ट या कालावधीत समुद्राला उधाण असल्याने किल्ल्यावर प्रवेशबंदी असते; शिवाय या काळात शिडाच्या होड्या चालवणेही सुरक्षित नसल्याने होड्या बंद असतात. मात्र आता शुक्रवार, १ सप्टेंबरपासून पर्यटकांना हा किल्ला पाहता येणार असल्याची घोषणा नुकतीच जंजिरा जलवाहतूक सोसायटीमार्फत करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा किल्ला पर्यटनासाठी खुला झाला आहे.कोकण किनारपट्टीवरील साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेला ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग हा वास्तुशिल्पाचा अजोड चमत्कार मानला जातो. सिद्दीविरु द्ध तब्बल चौदा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांनी कडवी झुंज दिली. तथापि शिवरायांना हा किल्ला सर करता आला नाही. म्हणूनच इतिहासप्रेमी तथा अभ्यासक या अभेद्य जंजिºयाचे गुपित जाणून घेण्यासाठी राजपुरीला येतात.जंजिरा किल्ल्यावर दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेटी देतात. त्यामुळे राजपुरी गावालगत राहणाºयांना स्वयंरोजगार मिळाला आहे. सुमारे २५ शिडाच्या होड्यांद्वारे पर्यटकांना किल्ल्यात नेले जाते. सूर्योदय व सूर्यास्त होईपर्यंत पर्यटकांना हा किल्ला पाहण्याची मुभा दिली जाते. २२ एकर परिसरात हा किल्ला व्याप्त असून, २२ बुरूज आहेत. त्याला ऐतिहासिक परंपरा लाभली असूनन, कलाल बांगडीसारखी अवाढव्य वजनाची मोठी तोफ किल्ल्यावर पाहायला मिळते. खाºया पाण्यात हा किल्ला असतानाही या ठिकाणी दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत.किल्ला पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असला तरी येथील देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. गोड्या पाण्याचे तलाव स्वच्छ करण्याची गरज आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी दोन ठिकाणी भगदाड पडले आहे. ते अद्यापपर्यंत बुजविण्यात आलेली नाहीत. काही भागाची पडझड झाली असून, त्वरित दुरुस्तीची गरज असल्याची मागणी इतिहासप्रेमींकडून करण्यात येत आहे.- किल्ला पर्यटकांना खुला करण्यात आल्याने या ठिकाणी वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार सुरू होणार आहे. पुरातत्त्व विभागाने हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी विशेषत्वाने मूलभूत सुविधा देण्याची गरज असल्याचे जंजिरा संस्थानचे अभ्यासक शरद चिटणीस यांनी सांगितले.
जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, दरवर्षी पाच लाखांहून अधिक नागरिकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 5:31 AM