आगरदांडा : मुरूड-राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला हा मार्च महिन्यापासून बंद केल्याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे. शुक्रवारी मेरीटाईम बोर्डानी पर्यटकांना किल्ल्यात ये-जा करण्यासाठी शिडाच्या होड्यांना परवानगी दिली. तरी पुरातत्त्व विभागाने परवानगी दिलेली नाही.
महाराष्ट्रातील सर्वच किल्ले पुरातत्त्व विभागामार्फेत पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. परंतु जंजिरा किल्ल्यावर अन्याय का? असा सवाल येथील व्यावसायिकांनी व शिडाच्या होडीमालकांनी पुरातत्त्व विभागाकडे केला आहे.दिवाळीच्या सुट्टीत किल्ला पाहण्याकरिता आलेल्या पर्यटकांना किल्ल्यात जाता न आल्याने त्यांची निराशा झाली. तर काहींनी शिड्याच्या होड्यांतून किल्ल्याजवळ जाऊन आनंद घेण्याचा प्रयत्न केला.जिल्हाधिकाऱ्यांनी किल्ला खुला करून देण्याची परवानगी दिली. मवेलकम जल वाहतूक सोसायटीचे चेअरमन जावेद कारभारी यांनी सांगितले, पुरातत्त्व विभागाने त्वरित पर्यटकांना किल्ल्यात ये-जा करण्याकरिता परवानगी द्यावी. परवानगी न दिल्याने दिवाळी सिजन पूर्णत: वाया गेला असून आता करायचे काय, असा प्रश्न येथील व्यावसायिकांना पडला आहे. तरी लवकरात लवकर किल्ल्याचे दरवाजे उघडून येथील सर्वच व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.