मुरुड जंजिरा : जंजिरा किल्ल्याप्रमाणे पदमदुर्ग किल्लासुद्धा पर्यटकांना पहाता यावा यासाठी तरगंत्या जेट्टीची तातडीने सुविधा मेरी टाइम बोर्ड व पुरातत्व खात्याने पुरवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला हा किल्ला पर्यटकांना पहाता यावा, अशी अनेक सामाजिक व पर्यटकांनी मागणी केली आहे. मुरूडपासून ३ कि.मी अंतरावर खडकावर उभ्या असलेल्या पद्मदुर्गचे दोन भाग पडतात. एक बालेकिल्ला तर दुसऱ्या खडकावर बांधलेला पडकोट किल्ला. ऐतिहासिक दस्तऐवजानुसार इ .स. १६७८ च्या सुमारास शिवाजी महाराजांनी पदमदुर्गाच्या बांधकामास सुरुवात केली तर बांधकामाची समाप्ती राजे संभाजींनी केली, असा उल्लेख आढळतो.
सिद्दीच्या ताब्यात असलेला जंजिरा महाराजांनी १४ /१५ वर्षे जंग जंग पछाडून सर करता आला नाही. म्हणूनच अंजिक्य जंजिऱ्यावर करडी नजर ठेवण्यासाठी पद्मदुर्गची निर्मिती केली होती. पदमदुर्ग किल्ल्याकडे पुरातत्व खात्याने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. खोल समुद्रात इतिहासाची साक्ष देणारा व मराठ्यांनी बांधलेला हा किल्ला असूनसुद्धा याचे संगोपन करण्यात पुरातत्व विभाग अपयशी ठरला आहे.
वास्तविक पाहाता जंजिरा किल्ल्याप्रमाणे येथे सुलभ वाहतूक होण्यासाठी पुरातत्व खात्याने कोठेही प्रामाणिक कर्तव्य न बजावल्याने पर्यटकांना हा किल्ला इच्छा असूनसुद्धा पाहाता येत नाही. या किल्ल्यावर तरंगती जेट्टी मांडवा बंदराप्रमाणे केल्यास पर्यटनाचा ओघ मुरुडकडे वाढण्यास मदत होणार आहे. मशीनवाली कोणतीही बोट थेट पदमदुर्ग किल्ल्यापाशी लागत नाही, यासाठी एक छोटी बोट घ्यावी लागते व त्याद्वारे किमान धोप्याभर पाण्यात उतरल्यावर किल्ल्यात पोहोचता येते. पर्यटकांना पदमदुर्ग किल्ल्यात अगदी सहज उतरणे अथवा चढणे सोपे झाले तर पदमदुर्ग किल्ल्यावरसुद्धा पर्यटकांची संख्या वाढणार आहे. कमी खर्चात उपलब्ध होणारी तरंगती जेट्टी येथे खूप आवश्यक आहे.