श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे पूल ढासळतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 01:16 AM2020-08-16T01:16:15+5:302020-08-16T01:16:45+5:30
श्रीवर्धन पंचायत समिती सभापती बाबुराव चोरगे यांनी मंगळवारी दुपारी पुलाची पाहणी केली आहे.
श्रीवर्धन : तालुक्यातील जावेळे नदीवरील जुना पूल ढासळत आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णत: थांबविण्यात आलेली आहे. श्रीवर्धन पंचायत समिती सभापती बाबुराव चोरगे यांनी मंगळवारी दुपारी पुलाची पाहणी केली आहे.
श्रीवर्धनला आॅगस्टमध्ये निरंतर एक आठवडा जोरदार पाऊस पडलेला आहे. जावेळे पुलाची बांधणी जावेळे नदीवरती करण्यात आलेली आहे. पुलाचे बांधकाम अंदाजे चाळीस वर्षांपूर्वीचे असावे, असे स्थानिक नागरिकांकडून समजले. पुलाची बांधणी ही दगडी स्वरूपात असून, वरच्या बाजूस सिमेंट व लोखंडाचा वापर केल्याचे दिसून येत आहे, तसेच पायथ्याच्या कामकाजासाठी दगड व इतर साहित्याचा वापर केलेला आहे. पुलाची लांबी अंदाजे २० फूट रुंदी १४ फूट व खोली अंदाज १८ फूट आहे. पुलाच्या दुतर्फा सिमेंटचे एक फुटाचे संरक्षक कठडे बांधण्यात आलेले होते.
पुलावरती पावसामुळे दोन्ही बाजूला अंदाजे सहा इंचांपेक्षा जास्त उंचीचे गवत उगवलेले आहे. पुलाचा आधार असलेल्या तीन संरक्षक भिंतींपैकी एक संरक्षक भिंत ढासळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्थानिक जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी यांच्याकडे दूरध्वनीद्वारे मनोहर सावंत या व्यक्तीने संबंधित घटनेची माहिती सोमवारी सायंकाळी कळवली होती. त्यानंतर, श्रीवर्धन तहसीलदार यांनी तत्काळ दखल घेत पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.
जावेळे पुलावरून वडशेत वावे, धारवली, आडी कोलमंडला, साखरोने, कारवीने या गावांचे दळणवळण चालते. मात्र, आजमितीस कोणतेही अवजड, वाहन पुलावरून गेल्यास अपघात होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. श्रीवर्धन पोलीस दलाकडून पुलाच्या दोन्ही मार्गांवर पूल वाहतुकीस बंद असल्याबाबत मार्गरोधक लावण्यात आलेले आहेत.
पुलाच्या खालून जावेळे नदीचा प्रवाह जोरात वाहत आहे. नदीचे पात्र दोन्ही बाजूस विस्तारित स्वरूपाचे आहे. पुलाच्या बरोबर मध्यभागी काही अंशी पूल खचलेला निदर्शनास येत आहेत. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीस धोकादायक ठरू शकतो. साखरोने, धारवली, आडी या गावातील लोकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करणे अगत्याचे झाले आहे. दुचाकीस्वार किंवा पादचारी पुलावरून जाऊ शकतो. मात्र, कोणतेही चारचाकी वाहन पुलावरून गेल्यास अपघाताची शक्यता निर्माण झालेली आहे.
>शिवभक्तांना दर्शनापासून वंचित राहावे लागणार
जावळे गावातील स्वयंभू शिव मंदिराच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात श्रीवर्धन तालुक्यातील विविध भागांतून लोक दर्शनासाठी जातात. मात्र, जावेळे पुल क्षतिग्रस्त झाल्यामुळे तालुक्यातील शिवभक्तांना दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. पंचायत समिती सभापती बाबुराब चोरगे, गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे, जावेळे सरपंच व ग्रामस्थ यांनी पुलाची पाहणी केली आहे.