तटकरेंच्या प्रचारासाठी शेकापच्या जयंत पाटलांचे कुटुंबच मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 12:16 AM2019-04-07T00:16:53+5:302019-04-07T00:17:09+5:30
‘साथी हाथ बढाना’ : गावबैठका, मतदारांच्या गाठीभेटी, प्रचारपत्रके वाटण्यावर भर
- आविष्कार देसार्ई
अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघामध्ये आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी शेकापने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शेकापच्या आतापर्यंत प्रचाराच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. गावबैठका, मतदारांशी थेट भेट आणि प्रचारपत्रके वाटण्यावर त्यांनी भर दिला आहे. यासाठी शेकापने आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवले आहे.
शेकापने नेहमीच व्यवस्थित नियोजन करूनच आतापर्यंत निवडणुका लढल्या आहेत आणि त्या जिंकल्यादेखील आहेत. त्यांच्या राजकीय रणनीतीचा सर्वच राजकीय पक्षांना चांगलाच अनुभव आहे. आघाडीचे उमेदवार तटकरे यांना निवडून आणण्यासाठी शेकापचे सुप्रिमो आमदार जयंत पाटील यांनी चंग बांधला आहे. यासाठी प्रचाराच्या सर्वच बाबींवर त्यांचे बारीक लक्ष आहे. शेतकरी भवनमधून ते रोजच्यारोज प्रचाराचा आढावा घेत आहेत. त्याचप्रमाणे प्रचाराचे नियोजनही केले जात आहे. बुथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांपासून ते आपले कुटुंब आणि स्वत:साठी त्यांनी कामाची जबाबदारी वाटून घेतली आहे. आमदार असलेले त्यांचे बंधू सुभाष पाटील हे सपत्नीक खारेपाटातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सरपंच, सदस्य आणि पदाधिकारी यांच्या भेटी घेत आहेत. रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील (भाचा), चित्रा पाटील, चित्रलेखा पाटील (सून), जयंत पाटील यांच्या पत्नी सुप्रिया पाटील, मुलगा नृपाल पाटील, मेहुणा प्रशांत नाईक हे कुटुंबातील तर, आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्या नीलिमा पाटील यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अलिबाग, पेण, महाड, श्रीवर्धन, गुहागर आणि दापोली या सहा विधानसभा मतदार संघात तटकरे यांना निवडून आणण्याचे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, काँग्रेस आणि मित्रपक्ष अशी आघाडी झाली आहे. आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वांचेच योगदान महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारीही सुरू आहे.
- प्रमोद घोसाळकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
तटकरेंना निवडून आणणे काळाची गरज
सर्वांगीण विकास साधण्यासाठी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना निवडून आणणे काळाची गरज आहे. जातीय शक्तींना रोखण्यासाठीच तटकरेंना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.
- आमदार सुभाष पाटील, शेकाप