विशेष प्रतिनिधीअलिबाग : आमदारांंचे मत मिळविणे फार कठीण आहे. ही निवडणूक एका वेगळ्या भूमिकेतून लढविण्यात आली आहे. या निवडणुकीची तयारी दीड वर्षापूर्वी केली होती. सर्वांच्या आशीर्वादामुळे निवडून आलो, त्यामुळे हा विजय सर्व कार्यकर्त्यांचा आहे. येणाऱ्या निवडणुकीत एक वेगळ्या भूमिकेतून काम करण्याची गरज आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचे पुरोगामी विचार या देशात, राज्यात जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.विधानपरिषदेवर चौथ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने येथील पीएनपी नाट्यगृहात पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. विवेक पाटील, आ. धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, शेकाप माजी जिल्हा सहचिटणीस शंकरराव म्हात्रे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नगरसेवक चित्रलेखा पाटील, माजी जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकरी कामगार पक्षात शेतकरी, कष्टकरी, कामगार, गोरगरिबांच्या विचाराला व तत्त्वाशी बांधिलकी जपणारी मंडळी आहेत. अनेकांंचे प्रश्न त्याच ताकदीने, उमेदीने सोडविण्याचे काम सर्वांनी एकत्र येऊन केले आहे, त्यामुळे राज्यात शेतकरी कामगार पक्षाची एक वेगळी ताकद निर्माण केली आहे. गेली अनेक वर्षे विधिमंडळात प्रभावी आमदार म्हणून नेतृत्व केले आहे, त्यामुळेच राज्यात वेगळा दबदबा निर्माण करण्यात यश आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमात माजी आ. विवेक पाटील आणि आ. धैर्यशील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते, माजी जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी या वेळी शेकापमध्ये प्रवेश केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप नाईक व आभार चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले.खोपोलीत ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागतखोपोली : महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवड झालेले आमदार जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर खोपोलीच्या प्रवेशद्वारावर शेकडोंच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या गजरात, फटक्याच्या आतशबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र विधानपरिषदेत मी चौथ्यांदा प्रवेश केलाय, त्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. रायगड जिल्ह्याच्या समस्यांना अग्रक्र माने न्याय देण्याकडे लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी खोपोलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विधानपरिषदेवर चौथ्यांदा निवडून जाण्याचा जयंत पाटील यांचा विक्रम, कार्यकर्त्यांचे मानले आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:54 AM