लोकमत न्यूज नेटवर्करायगड : आलिबागजवळ समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पाच पर्यटकांवर शनिवारी जेली फिशने हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या पर्यटकांवर उपचार करून त्यांना रविवारी सोडण्यात आले.जेली फिशने हल्ला केलेले पर्यटक हे नवी मुंबई आणि कुर्ला परिसरातील आहेत. समीर विजय पवार (१३, नवी मुंबई), रोशन रमेश सुर्वे (१३, नवी मुंबई), साहिल अजय वावरे (१५, कुर्ला), अभिनय अनुराग गुप्ता (४, घणसोली), नारायण पाटील (३९) अशी पर्यटकांची नावे आहेत.शनिवारी समीर, रोशन, साहिल, अभिनय आणि नारायण पाटील हे अलिबागच्या समुद्रकिनारी गेले होते. त्या वेळी त्यांना समुद्राच्या पाण्यामध्ये जेलीसारखा पदार्थ तरंगताना दिसला. त्यांनी जेली फिशबरोबर खेळण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी त्याला आपल्या हातामध्ये घेतले. त्यामुळे जेली फिशने त्यांच्यावर हल्ला करीत, हाता-पायांचा चावा घेतला. त्यामुळे घाबरलेले पर्यटक पाण्याबाहेर आले. त्यांच्या अंगाला खाज सुटल्याने त्यांना तातडीने अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. समीर पवार याला अधिकच त्रास होत असल्याने, त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले.
अलिबागमध्ये पाच पर्यटकांवर जेली फिशचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 5:17 AM