काशीद येथील जेट्टीचे काम 60 टक्के पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 12:54 AM2021-05-07T00:54:31+5:302021-05-07T00:54:53+5:30
सागरमाला योजनेअंतर्गत ११० कोटी रुपये खर्च : दोन तासांत मुंबई गाठता येणार
संजय करडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यातील काशीद या ठिकाणी केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत ११० कोटी रुपये खर्च करून भव्य दिव्य जेट्टी बांधण्याच्या वेग प्राप्त केला असून सन २०२१ अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. जलवाहतुकीने केवळ दोन तासात मुंबई येथून काशीद गाठता येणार आहे.
मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनारा हे ठिकाण आंतराष्ट्रीय ठिकाणात समाविष्ट झाल्याने येथे दरवर्षी देशी-विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी वर्षाला ७ लाखांपेक्षा जास्त पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात. सध्या काशीद येथे येणारे पर्यटक मुंबई येथून मांडवा व वाहनाने अलिबाग मार्गे काशीद या ठिकाणी पोहोचत असतात. काशीद समुद्रकिनारी सुट्टीच्या दिवसात किमान एका दिवसाला १० हजारपेक्षा जास्त पर्यटक येत असतात. मुंबईहून काशीदला येताना प्रवासात किमान तीन तास वाया जात होते. प्रवासाचे अंतर कमी व्हावे व मुंबईतील पर्यटकांना थेट काशीद या ठिकाणी रो-रो सेवा अथवा पॅसेंजर जेट्टीद्वारे जलद गतीने पोहचता यावे यासाठी २०१८ साली केंद्र सागरमाला योजनेअंतर्गत काशीद येथे मोठी जेट्टी विकसित करण्यासाठी मान्यता मिळून निधीही प्राप्त झाल्याने काम जलद गतीने पूर्ण करण्याचा इरादा आहे.
रो रो सेवेसाठी खोल समुद्रात टे-टे-स्पॉर्ट अंथरण्यात येतात. त्याची सुयोग्य मांडणी केली जाते आहे. सिमेंट काँक्रिटचे टे-टे-स्पॉर्ट बनवण्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचा थर समुद्रात टाकण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. मे अखेर पर्यंत टे-टे-स्पॉर्टचे काम पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. टे-टे-स्पॉर्ट अंथरून झाल्यावर पुढील काम जलद गतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. काशीदच्या सुंदर किनाऱ्यावर पर्यटकांना जाता यावे, यासाठी त्या ठिकाणच्या समुद्राच्या लाटा थोपविण्यासाठी २०१८ ला आवश्यक ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो-रो जेट्टी, पॅसेंजर जेट्टी निर्माण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाला पाठविण्यात आला होता. त्याला केंद्रीय पर्यावरण विभागाने मान्यता दिली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प काही काळ रखडला होता.
मुरुड तालुक्याला होणारे फायदे
nमुंबई प्रवासाचे अंतर वाचणार
nस्थानिकांना मोठा रोजगार प्राप्त होणार
nऑटो रिक्षा अथवा मिनी डोअर यांचा थांबा तयार होऊन मुरुडकडे येण्याची व्यवस्था झाल्याने
रिक्षा चालकांच्या रोजगारात
वाढ होणार
nप्रवासाचे अंतर कमी झाल्याने मुरुड समुद्र किनारी असणाऱ्या हॉटेल लॉजिंग यांना मोठा फायदा होणार
nसमुद्रकिनारी विविध टपरीधारक पर्यटकांना सुविधा देणाऱ्यांच्या व्यवसायात वृद्धी होणार
nमुंबई काशीद दोन तासांचे अंतर त्यामुळे प्रवासाचे तास वाचणार
nऔद्योगीकरणाला मोठी चालना मिळून बेरोजगारीचे प्रमाण घटण्यास मदत होणार
nथेट काशीद गाठता आल्याने पर्यटकांचे प्रवासाचे
तास वाचणार
काशीद येथील ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो-रो जेट्टी, पॅसेंजर जेट्टी निर्माण करण्यासाठी सन २०१८ साली सागरमाला योजनेअंतरंगत केंद्राकडून ११२ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. काशीद जेट्टीचे काम सध्या आतापर्यंत किमान ६० टक्के पूर्ण झाले आहे. संबंधित ठेकेदाराने बारशीव येथे सिमेंट काँक्रिटचे टे-टे-स्पॉर्ट बनवल्यामुळे कामाचा कालावधी कमी होण्यास मदत झाली आहे. सन २०२१ अखेर अथवा सन २०२२ च्या मार्च महिन्यापर्यंत या जेट्टीचे काम पूर्ण झालेले असणार आहे.
- सुधीर देवरे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड