रायगड : अलिबाग येथील जिजामाता रुग्णालय कोरोना रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे काही रुग्णांना जमिनीवरच झोपवून उपचार करावे लागत आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे यातील एक रुग्ण स्वच्छतागृहात जमिनीवर झोपल्याचे समोर आले आहे. रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे रुग्णांची चांगलीच गैससोय होत आहे. विशेष म्हणजे महिलांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्ययंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालये अपुरी पडत आहेत. प्रत्येक रुग्णाला उपचार मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न होत असले तरी, ते समाधानकारक नसल्याचे दिसून येते. अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालय आणि जिजामाता येथे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्हा सरकारी रुग्णालयही रुग्णांनी भरून गेले आहे, तर जिजामाता रुग्णालयात ६० खाटा आहेत. सध्या ७५ हून अधिक रुग्णांवर येथे उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे काही रुग्णांना जमिनीवरच झोपवण्याची वेळ आली आहे. तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. येथील स्वच्छतागृहात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे स्वच्छतागृहाचा वापर कसा करायचा, असा प्रश्न रुग्णांना पडला आहे.
महिलांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांतून चांगलाच संताप व्यक्त करण्यात येत आहे. काही प्रमाणात बरे वाटत असणारे रुग्णही बेड खाली करत नसल्याने अन्य रुग्णांवर वेटिंगवर राहावे लागत आहे. त्यामुळे ते उपाचारांपासून वंचित राहत आहेत. सरकार आणि प्रशासनाने चांगली सोय करावी, अशी मागणी होत आहे. आमच्या रुग्ण पूर्ण बरा होणे गरजेचे आहे. मध्येच सुटी घेतली आणि पुन्हा रुग्णालयात भरती करायचे झाल्यास परत बेड मिळणार नाही, असेही एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले. येणाऱ्या सर्वांना उपचार मिळावेत, अशी आमची भूमिका आहे. मात्र, खाटा कमी पडत आहेत. त्यातूनही रुग्णांवर उपचार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. अनिल फुटाणे यांनी दिली.
काही प्रमाणात रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना सुट्टी देण्यात येत असल्याचे सांगितल्यावर तेही बेड सोडायला तयार नाहीत. त्यांनी बेड रिकामे केल्यावर वेटींगवर असणाऱ्या रुग्णांना बेड उपलब्ध होऊ शकतो मात्र ते नकार देत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे. यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांची मदत घेऊन त्यांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातील काही रुग्ण तयार होतात तर काही रुग्ण अडून बसत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.स्वच्छतागृहात सातत्याने झोपणाऱ्या रुग्णालाही त्यांच्या बेडवर झोपण्यास सांगण्यात येते. मात्र तो रुग्ण कोणाचेच ऐकत नाही आणि स्वच्छतागृहातच जाऊन झोपत आहे. त्या रुग्णाबाबत मनोरुग्णतज्ज्ञांना पाचारण करणार आहोत, असे फुटाणे यांनी सांगितले.