जेएनपीए बंदरांतील कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना १५ हजार रुपयांपर्यंत पगारवाढीचा करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 04:32 PM2023-08-11T16:32:25+5:302023-08-11T16:33:08+5:30
पगारवाढीच्या करारामुळे कामगारांना विविध सोयी-सुविधांसह १५ हजार रुपयांपर्यंत पगार वाढ मिळणार आहे.
मधुकर ठाकूर, उरण: जेएनपीए बंदरात पायलट,टगबोटींवर मे.एस.एच.एम. शिपकेअर कंपनीतील मे. टिमवर्क सिस्टीम या कंपनीच्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी पगारवाढीचा करार करण्यात आला आहे.न्यू मॅरीटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या २०२३ ते २०२५ या तीन वर्षांसाठी झालेल्या पगारवाढीच्या करारामुळे कामगारांना विविध सोयी-सुविधांसह १५ हजार रुपयांपर्यंत पगार वाढ मिळणार आहे.
जेएनपीए बंदरात मागील अनेक वर्षांपासून पायलट, टगबोटींवर खलाशी आणि इतर पदांवर सुमारे ४० कामगार काम करतात. मे.एस.एच.एम. शिपकेअर कंपनीतील मे. टिमवर्क सिस्टीम या कंपनीच्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात कंपनीकडून टाळाटाळ केली जात होती. न्यू मॅरीटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार नेते महेंद्र घरत यांनी कामगारांना आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता.कंपनी विरोधात केलेला संघर्ष आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर वठणीवर आलेल्या व्यवस्थापनाने वेतनवाढीचा करार आणि कामगारांना आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता दिली. त्यानंतर न्यु मॅरीटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कंपनीबरोबर २०२३ ते २०२५ या तीन वर्षांसाठी झालेल्या पगारवाढीचा करार करण्यात आला.या वेतनवाढीच्या करारामुळे कामगारांना ९००० ते १५००० पगारवाढ, १९५०० ते ३०००० बोनस, ३२ तासाचा अनुदान म्हणून एक्स्ट्रा पगार, मागील १४ वर्षाची ग्र्युजूईटी मिळणार आहे. तसेच २ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, १ लाख रुपयांचा अपघात विमा, कामगारांना पीएफही सुरु करण्यात आले आहे.
या करारनाम्याच्या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पी. के. रामण, कामगार प्रतिनिधी सुनील कोळी, यशवंत कोळी, अनिल कोळी, मोरेश्वर घरत, मितेश पाटील, दिनेश म्हात्रे, सगर घरत, जुबेर मास्टर आदि उपस्थित होते.