पुनर्वसनासाठी JNPA समुद्र चॅनल बंद; आंदोलनावर वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 07:07 PM2023-04-12T19:07:35+5:302023-04-12T19:08:05+5:30
आंदोलन रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाची बळाचा वापराची तयारी : पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी उडण्याची शक्यता
मधुकर ठाकूर
उरण : हनुमान कोळीवाडा फेर पुनर्वसनाच्या प्रश्नावर मंगळवारी (११) बोलाविण्यात आलेल्या बैठकीत जेएनपीए प्रशासनाने ग्रामस्थांच्या सर्वच अटी-शर्थी मान्य करून याप्रकरणातील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रलंबित प्रश्न दोन महिन्यांच्या कालावधीत सोडविण्याचे ठोस आश्वासनही दिले आहे. पोलिस, जेएनपीए प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही मात्र हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा हेका कायम ठेवल्याने पोलिसांनीही आंदोलन रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
वेळप्रसंगी बळाचा वापर करून आंदोलनापुर्वीच आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची तयारीही सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.यामुळे पुनर्वसनाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जमीन मिळावी या मागणीसाठी मागील ३५ संघर्ष सुरू आहे.या ३५ वर्षांच्या संघर्षानंतर जेएनपीटी व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून हनुमान कोळीवाडा येथील २५६ कुटुंबीयांचे जुन्या फुंडे- जसखार गाव दरम्यान जेएनपीटीच्या मालकीच्या १०.०६ हेक्टर भुखंड देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
या विकसित करण्यात येणाऱ्या जागेमध्ये ६,९,१२ मीटर रुंदीचे रस्ते तयार करण्यालाही जेएनपीएने मान्यता दिली आहे.भुखंड विकसित करण्याच्या कामासाठी आवश्यक खर्चाची ५ कोटी ५९ लाखांची रक्कमही जेएनपीए प्रशासनाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केली आहे.मात्र जेएनपीए, जिल्हाधिकारी, सिडको यांच्यातच सुरू असलेल्या अंतर्गत घोळामुळे वारंवार दिलेल्या आश्वासनानंतरही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना अद्यापही विकसित भुखंडाचा ताबा मिळालेला नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी १५ एप्रिल रोजी जेएनपीए समुद्र चॅनल बंद करून मालवाहू जहाजे भर समुद्रात रोखून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा इशाऱ्यानंतर मंगळवारी (११) रोजी जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांची बैठक झाली.प्रशासन भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सकारात्मक झालेल्या बैठकीतुन ग्रामस्थांच्या सर्वच अटी-शर्थी मान्य केल्या आहेत. तसेच या प्रकरणातील काही बाबी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत आहेत.केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रलंबित प्रश्न दोन महिन्यांच्या कालावधीत सोडविण्याचे ठोस आश्वासनही दिले आहे.मात्र ग्रामस्थांचे समाधान झाले नसल्याने गावकऱ्यांशी चर्चा करूनच आंदोलनाबाबत निर्णय घेण्याचा निर्णय हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी बैठकीत जाहीर केला होता.त्यानुसार मंगळवारी (११) संध्याकाळी हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी १५ एप्रिल रोजी घेतलेल्या समुद्र चॅनल बंद आंदोलनाच्या निर्णयावर ठाम राहण्याचा पवित्रा घेतला असल्याची माहिती हनुमान कोळीवाडा सरपंच परमानंद कोळी व ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी दिली.ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे मात्र जेएनपीए, पोलिस, जिल्हा प्रशासना विरोधात संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मात्र पोलिस, जेएनपीए प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल बंद” आंदोलनाचा हेका कायम ठेवला आहे.यामुळे पोलिसांनीही नाईलाजाने आंदोलन रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.वेळप्रसंगी बळाचा वापर करून आंदोलनापुर्वीच आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची तयारी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. याआधीही पोलिसांनी आंदोलनं रोखण्यासाठी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची तसेच धरपकडीची कारवाई केली होती.मात्र त्यानंतरही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना चकवा देत गनिमीकाव्याने आंदोलन करुन मालवाहू जहाजे रोखून धरली होती.