मधुकर ठाकूर, उरण : जेएनपीएने उरण परिसरातील गावातील १६ विविध विकासकामांसाठी सीएसआर फंडातून १७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या मंजुर निधीची घोषणा जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी केली आहे.
जेएनपीएने याआधीच शेकडो कोटींच्या सीएसआर फंडाची काही राजकीय पक्षांच्या मागणीवरून खैरात केली आहे.स्थानिकांना डावळून वाटप करण्यात आलेल्या या शेकडो कोटींच्या सीएसआर निधीच्या वाटपावरून येथील प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची भावना आहे.स्थानिकांचा असंतोष जेएनपीएला परवडणारा नाही. त्यामुळे जेएनपीटीचे प्राधिकरण झाल्यानंतर आणि प्राधिकरणामुळे जेएनपीए बोर्ड ऑफ ट्र्स्टींकडेच ठराविक निधी मंजूरीचे अधिकार आले आहेत. या अधिकारानंतर स्थानकांच्या भावना लक्षात घेऊन जेएनपीएने उरण परिसरातील गावातील १६ विविध प्रकल्पाच्या विकासकामांसाठी सीएसआर फंडातून १७ कोटींचा निधी मंजूर केला आहे.फेबु्वारी महिन्यात झालेल्या बोर्ड ऑफ ट्र्स्टींच्या बैठकीत या १७ कोटींच्या सीएसआर निधीला मंजुरी देण्यात आली होती.या मंजुरी देण्यात आलेल्या सीएसआर फंडातील विविध विकासकिमांची घोषणा नुकतीच जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी स्थानिकांच्या बैठकीतुन केली आहे.यामध्ये सर्वाधिक ९ कोटी ८९ लाख ७० हजार सीएसआर फंड नविन शेवा ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते ,गटारे आदी विकास कामांवर खर्च करण्यात येणार आहे.तर जनकल्याण सेवाश्रम बेलपाडा -उरण तर एक कोटीचा निधी रयत शिक्षण संस्थेला देण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीए प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या मंजूर करण्यात आलेल्या १७ कोटींच्या सीएसआर फंडातून आरोग्यसेवा, शिक्षण, पर्यावरण आणि समुदाय विकास यांसह विविध क्षेत्रांचा समावेश आहे. उल्लेखनीय उपक्रमांमध्ये वंचित महिलांसाठी कर्करोगाशी संबंधित तपासणी, ट्रक चालकांसाठी आरोग्य संरक्षण, परिघीय रस्ते आणि ड्रेनेज सिस्टीमचे बांधकाम, पर्यावरण जागरूकता, कौशल्य विकास कार्यक्रम, पूर व भूस्खलन प्रभावित भागात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा यांचा समावेश आहे.हे प्रकल्प बंदराच्या सभोवतालच्या समुदायांमधील गरजा पूर्ण करण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि रहिवाशांचे कल्याण वाढवण्यासाठी बनविलेले असल्याचे जेएनपीएचे कामगार ट्र्स्टी रविंद्र पाटील यांनी सांगितले.