मधुकर ठाकूर
उरण - जेएनपीएच्या चौथ्या बंदराशी जोडणाऱ्या व रखडत सुरू असलेल्या ६८ कोटी खर्चाच्या व ७०० मीटर लांबीचा दुपदरी विस्तारित (एक्स्टेन्शन) उड्डाणपूल ऑगस्टपासून कंटेनर वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न जेएनपीएकडून सुरू आहे. यामुळे जसखार उड्डाणपुलामार्गे होणारी कंटेनर वाहतुकीची वर्दळ कमी होण्यास मदत होणार आहे. जेएनपीए अंतर्गत सिंगापूर पोर्ट (भारत मुंबई कंटेनर टर्मिनल) हे खासगीकरणाच्या माध्यमातून सर्वांत मोठ्या लांबीचे चौथे बंदर उभारण्यात येत आहे. ८००० कोटी खर्चाच्या या चौथ्या बंदराच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या टप्यातील कामाला प्रारंभ झाला आहे.
या बंदरातून वर्षाकाठी ५० लाख कंटेनर मालाची वाहतूक होणार आहे. चौथ्या बंदराशी जोडणाऱ्या या ६८ कोटी खर्चाच्या व ५३५ मीटर लांबीच्या दुपदरी एक्स्टेन्शन उभारणीचे उड्डाणपूल काम एनएचएआय कंपनीकडे सोपविले होते. या उड्डाणपुलाचे अप्रोच ड्रेनेजचे काम येत्या १०-१५ दिवसांत पूर्ण झाल्यानंतर तो जेएनपीएकडे सुपूर्द होईल. वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय जेएनपीए घेईल.
१८ जुलैला निर्णय सध्या करळ व जसखार पोलिस ठाण्यासमोरील उड्डाणपूलमार्गे कंटेनरची वाहतूक केली जात आहे. अनेक अडचणींवर मात करून या पूर्णत्वाच्या मार्गावर असलेला उड्डाणपूल चौथ्या बंदरांतील कंटेनर मालाच्या वाहतुकीसाठी ऑगस्टमध्ये खुला करण्याची तयारी जेएनपीएने सुरु केली आहे. उड्डाणपूल खुला करण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी येत्या १८ जुलै रोजी बैठक बोलावली असल्याची माहिती जेएनपीएच्या पीपीडी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली