मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीए बंदराने बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या "स्वच्छ सागर, सुरक्षित सागर, स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद्र" उपक्रमांतर्गत उरण येथील पीरवाड बीचवर स्वच्छता मोहीम राबवली होती.या मोहिमेत जेएनपीएचे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह ७५ कामगार सहभागी झाले होते. त्यांनी पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या आदी सुमारे दोन टेम्पो कचरा जमा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली.
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.जेएनपीए बंदराने बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत सागरी किनारपट्टीच्या स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमाअंतर्गत किनारपट्टीच्या प्रत्येक किलोमीटरसाठी ७५ स्वयंसेवकांसह देशभरातील ७५ समुद्रकिनाऱ्यांवर किनारपट्टी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.याच उपक्रमाअंतर्गत गुरुवारी (२५) उरण येथील पीरवाडी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती.या मोहिमेत पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या आदी सुमारे दोन टेम्पो कचरा जमा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.यावेळी समुद्र किनारा वाचविणे, संरक्षित करणे आणि स्वच्छ ठेवण्यासाठी समुद्र किनाऱ्याजवळ राहणाऱ्या स्थानिक समुदायाशी या अधिकाऱ्यांनी संवाद साधला.त्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरणासाठी स्वच्छ आणि सुरक्षित समुद्र किनाऱ्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण केली.
प्लॅस्टिकच्या वापरामुळे आपले सागरी जीवन कसे नष्ट होत आहे याविषयीही जनजागृती केली.प्लॅस्टिक कचरा आणि इतर कचऱ्याचा सागरी जीवनावर होणारा नकारात्मक परिणाम याविषयी सामाजिक संदेशासह स्वच्छ आणि सुरक्षित समुद्र किनाऱ्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पथनाट्याचेही सादरीकरण केले.