जेएनपीटी करणार वीजनिर्मिती, सेझ प्रकल्पासाठी ५० कोटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 12:55 AM2020-11-06T00:55:43+5:302020-11-06T00:56:13+5:30
JNPT : जेएनपीटीने २७७ हेक्टर क्षेत्रात अत्याधुनिक सेझ प्रकल्प निर्मितीचे काम सुरू केले आहे.
उरण : जेएनपीटीत उभारण्यात येत असलेल्या सेझ प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र ५० मेगावॉट वीजनिर्मितीचे सबस्टेशन उभारण्यात येत आहे. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत हे सबस्टेशन कार्यान्वित होणार आहे. सुमारे ५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या सबस्टेशनमुळे सेझमधील व्यावसायिकांना अगदी कमी दरात वीजपुरवठा करणे शक्य होणार असल्याची माहिती जेएनपीटी अधिकाऱ्यांनी दिली.
जेएनपीटीने २७७ हेक्टर क्षेत्रात अत्याधुनिक सेझ प्रकल्प निर्मितीचे काम सुरू केले आहे. केंद्र सरकारच्या नौकानयन मंत्रालयाच्या सागरमाला योजनेतून सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या जेएनपीटी सेझ प्रकल्पाच्या पायाभरणीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१४ मध्ये झाले आहे. नव्याने सुरू होण्याच्या मार्गावर असलेले नवी मुंबई एअरपोर्ट, डीएफसी रेल कॉरेडाॅर, ट्रान्स हार्बर लिंकशी हा अत्याधुनिक सेझ प्रकल्प जोडला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या जेएनपीटी सेझमध्ये देशी-विदेशी कंपन्यांकडून हजारो कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. तसेच, सुमारे सव्वा लाख रोजगारही उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या जेएनपीटी सेझ प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी जेएनपीटीमार्फतच ५० मेगावॉट वीजनिर्मिती क्षमतेचे सबस्टेशन उभारण्यात येत आहे.
त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. फक्त जेएनपीटी सेझ प्रकल्पासाठीच पहिल्यांदाच ओव्हर हेड लाइनचा वापर करून वीजनिर्मिती केंद्र उभारत आहे. .
५० मेगावॉट वीजनिर्मिती
कोरोनामुळे हे सबस्टेशन उभारणीचे काम लांबणीवर पडले होते. मात्र सध्या जलदगतीने सुरू असलेल्या कामामुळे सबस्टेशन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे सेझ प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र ५० मेगावॉट वीजनिर्मितीचे सबस्टेशन येत्या डिसेंबर अखेरपर्यंत कार्यान्वित होईल, असा विश्वास जेएनपीटी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
अखंडित वीजपुरवठा
सबस्टेशनमुळे सेझमधील व्यावसायिकांना १२ ते १३ रुपये प्रति युनिट इतक्या कमी दरात वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच वीजपुरवठा अखंडित राहणार .