जेएनपीटी बंदरात कंटेनर बुडाले
By admin | Published: April 2, 2016 02:55 AM2016-04-02T02:55:01+5:302016-04-02T02:55:01+5:30
जेएनपीटी बंदरात जहाजातून आलेल्या कंटेनर मालाची हाताळणी करीत असताना कंटेनर पाण्यात पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. पाण्यात पडलेले काही कंटेनर बुडाले असून तरंगते
उरण : जेएनपीटी बंदरात जहाजातून आलेल्या कंटेनर मालाची हाताळणी करीत असताना कंटेनर पाण्यात पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. पाण्यात पडलेले काही कंटेनर बुडाले असून तरंगते कंटेनर पाण्याबाहेर काढण्यात आल्याची माहिती जेएनपीटी नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
परदेशातून कंटेनरमधून माल घेऊन आलेल्या नार्दन प्रिलोड हे जहाज जेएनपीटी बंदराच्या मालकीच्या दोन क्रमांकाच्या जेट्टीवर लॅण्ड झाले होते. जहाजातून अत्याधुनिक क्रेनने कंटेनरची चढ -उतार करीत असतानाच शुक्रवारी (१एप्रिल) सकाळी ७.४८ वाजण्याच्या सुमारास काही कंटेनर समुद्राच्या पाण्यात पडले असल्याची माहिती कामगारांनी दिली. पडलेले कंटेनर पडल्याने बंदरात येणाऱ्या जहाजांना अडचणीचे होऊ लागले होते. समुद्राच्या पाण्यावर तरंगते कंटेनर काढण्यासाठी जेएनपीटीची चांगलीच तारांबळ उडाली. अथक प्रयत्नानंतर काही कंटेनर समुद्रातून काढण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले. काही कंटेनर बंदराच्या आसपासच बुडाले असल्याची माहिती दिली. मात्र कंटेनर लॉकिंगमध्ये दोष असल्याने केवळ दोनच कंटेनर पाण्यात पडले असल्याचे जेएनपीटी प्रशासनाने सांगितले. याबाबत दोषींवर आॅपरेशन विभाग चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
लॉकिंगमध्ये दोष
कंटेनर लॉकिंगमध्ये दोष असल्याने दोनच कंटेनर पाण्यात पडले. समुद्रात पडलेले दोनही कंटेनर रिकामे असून त्यापैकी एक कंटेनर पाण्याबाहेर काढण्यात आल्याची माहिती जेएनपीटी शिफ्ट इन्चार्ज सुनील कुमार यांनी दिली. याबाबत दोषींवर आॅपरेशन विभाग चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे जेएनपीटीने सांगितले.