मोहोपाडा : काँग्रेसने गरिबी हटाव म्हणून सांगितले होते. देश श्रीमंत आहे, मात्र जनता गरीब आहे. जेएनपीटीत एक लाख कोटीपेक्षा जास्त खर्च करून रोजगार निर्मिती होत आहे. येथे रायगडचाच कामगार असणार आहे. या भागात बीपीसीएलमध्ये येथील स्थानिकांना नोकरी मिळेल. त्यांच्या मुलांना रोजगार कसा मिळेल याची जास्त चिंता आहे. आई- वडिलांच्या आग्रहाने तिकीट मिळत आहेत. मुंबई, गोव्याचे काम जोरात सुरू असून हा रस्ता फोरलेन सिमेंटचा होईल. महाराष्ट्रात पाच लाख कोटींची रस्त्यांची कामे सुरू आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. चारधाम रस्ता लवकरच पूर्ण होईल. जनतेने परिवर्तन केले म्हणून आज रस्त्यांचे व सोयी-सुविधांचे जाळे विणले गेले आहे. आतंकवादी संघटनांना उचलून फेकणारा मजबूत पंतप्रधान आहे, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले.शिवसेना - भाजप - आरपीआय - रासप - शिवसंग्राम - रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी मोहोपाडा येथे जाहीर सभा झाली. या वेळी नितीन गडकरी बोलत होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलली गेली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत यासाठी केंद्र व राज्य सरकारने पावले उचलली आहेत. बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम भाजप सरकार करत आहे. मुद्रा योजनेतून बिनव्याजी कर्ज देऊन बेरोजगारी हटविण्याचे काम हे सरकार करीत आहे. शेतीचे उत्पादन दुप्पट व्हावे यासाठी सरकारने प्रयत्न केले. हा देश जगाच्या पाठीवर यावा यासाठी नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले, असे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी सांगितले.आ. प्रशांत ठाकूर म्हणाले की, या परिसरातील कारखानदारी वाढत आहे. येथील एचओसी कारखाना १९९५ मध्ये कात टाकत होता. येथे बीपीसीएलसारखा कारखाना आल्याने येथील शेतकऱ्यांत नवसंजीवनी निर्माण झाली आहे. या परिसरात नव्याने येणारा रोजगार वाढणार आहे. जे देशात पाहायला मिळत ते रायगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.येथील प्रकल्पग्रस्तांना येथील कारखान्यात नोकरी मिळाली पाहिजे, येथे बीपीसीएलकडून हॉस्पिटल व्हावे, ज्या जमिनी शेतकºयांच्या ताब्यात आहे त्या त्यांना मिळाव्यात, अशी मागणी जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी के ली. या वेळीकेंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी खासदार रामशेठ ठाकूर आदी उपस्थित होते.
जेएनपीटीत एक लाख कोटीपेक्षा जास्त खर्च करून रोजगारनिर्मिती होतेय - नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:44 AM