उरण(रायगड) : जेएनपीटीच्या चौथ्या बंदरातून भारत ते युरोपशी जोडणारी कंटेनर वाहतुकीची सेवा सोमवार (१२)पासून सुरू झाली आहे. १० हजारांहून अधिक कंटेनर वाहतुकीची क्षमता असलेले २५० मीटर लांबीचे ‘एक्स्प्रेस रोम’ हे मालवाहू जहाज सोमवारी बंदरात दाखल झाले.जेएनपीटच्या चौथ्या बंदरात लॅण्ड झालेले हे दुसरे जहाज आहे. जेएनपीटी अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या बीएससीटी या चौथ्या बंदरातील या सप्ताहातील दुसरे जहाज असून थेट युरोपला जोडणारे हे पहिलेच जहाज आहे.थेट युरोपशी जोडणारी ही सेवा भारताशी अॅनटवर्प, हॅमबर्ग व लंडन येथील उत्तर युरोप बंदराशी जोडली असून इंडियन सर्व्हिस व ओशियन सर्व्हिसच्या माध्यमातून जोडली आहे. भागीदार कंपनीकडून आणखी तीन जहाजे बंदरात दाखल होणार आहेत. जुलै महिन्यांपर्यंत आणखी तीन क्रे न्स बंदरात दाखल होणार आहेत. यामुळे कंटेनर हाताळणीची क्षमता आणखी वाढणार असल्याची माहिती बीएससीटीचे सीईओ सुरेश आमिरापू यांनी दिली.
जेएनपीटीच्या चौथ्या बंदरातून थेट युरोपशी सेवा, ‘एक्स्प्रेस रोम’ दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 2:34 AM