दादर सागरी पोलिसांमुळे जोहे-तांबडशेत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
By निखिल म्हात्रे | Published: August 21, 2023 12:55 PM2023-08-21T12:55:38+5:302023-08-21T12:56:39+5:30
सुखकर प्रवासासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करा - अजित गोळे.
निखिल म्हात्रे, अलिबाग: देशासह संपूर्ण जगात पेणच्या गणेशमूर्तिंची ख्याती आहे. जोहे-हमरापूर परिसर गणेश मूर्तींचे हब म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळेच देश विदेशात गणेशमूर्तीना खूप मागणी असते. आणि ह्या मूर्ती विकत घेण्यासाठी राज्यासह देशाच्या काना कोपऱ्यातून विक्रेते हे स्वतःचे वाहन घेऊन सदर परिसरात येत असल्याने हमरापूर ते कळवे,दादर रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे "गणपती बाप्पा आम्हाला पाव" असा धावा करीत जोहे-हमरापूर विभागातील सर्व सरपंच व ग्रामस्थांनी कळवे, जोहे, तांबडशेत, हमरापूर रस्त्यावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे दादर सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे यांची भेट घेतली.
अजित गोळे यांनी पोलिस व नागरिकांची एकत्र मीटिंग घेऊन योग्य नियोजन करत सदर मार्गातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला व तो यशस्वी देखील केला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम अविरतपणे सुरु असतानाच आता पेण तालुक्यातील दादर सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी अजित गोळे यांनी या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा अडथळा दुर करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. आणि त्यात ते यशस्वी देखील होत आहेत. गणेशोत्सवा पर्यंत ही वाहतूक कोंडी दुर करण्यासाठी तयार केलेल्या आराखड्याचा नागरिकांनी, वाहन चालकांनी आणि गणपती कारखानदारांनी पालन करून सुखकर प्रवासासाठी सहकार्य करा असे आवाहन दादर सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित गोळे यांनी केले आहे.
पेण तालुक्यातील दादर सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या हमरापुर, जोहे, कळवे, दादर, सोनखार, तांबडशेत, रावे, उर्नोली, वरेडी आदी गावांमध्ये शेकडो गणपती मूर्तीचे कारखाने आहेत. यंदाचा गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने या भागात गणपती विकत घेणारे अनेक व्यापारी मोठमोठे टेंपो, ट्रक किंवा इतर वाहने घेउन येत असतात. त्यातच येथील स्थानिकांची वाहने आणि एसटी महामंडळाच्या बसेस देखील या ठिकाणी येत असल्याने अरुंद असणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. त्याच प्रमाणे महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई - गोवा महामार्गावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे या महामार्गावरून प्रवास टाळून उरण, मुंबई कडे जाणारे अनेक प्रवासी या हमरापुर - जोहे मार्गाचा वापर करत आहेत.
परिणामी या सर्व गोष्टींमुळे या ठीकणी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी मोडीत काढण्यासाठी दादर सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित गोळे यांनी गणपती कारखानदार, गणपती टेंपो चालक, मिनिडोअर रिक्षा चालक, एसटी प्रशासन व पोलिसांची दोन वेळा एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत सुंदर असा मास्टर प्लॅन तयार केला. दररोज पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी, गणपती कारखानदारांचे दोन सदस्य व नागरिक हे दररोज वाहतूक कोंडी दुर करण्यासाठी कार्यरत असणार असून दररोज त्यांचे नाव आणि नंबर या व्हॉट्स ॲप ग्रुपवर टाकण्यात येत आहेत. त्यातुन जर कुठे वाहतूक कोंडी झाली असेल तर ती दुर करण्यासाठी हे प्रयत्नशील असणार आहेत. त्याशिवाय जनजागृती म्हणुन दादर सागरी पोलिस स्टेशनच्या वतीने परिसरातील सहा ठिकाणी सूचनांचे बॅनर देखील लावण्यात आले आहेत. संबंधीत सूचनांची व्हॉईस क्लिप तयार करून त्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार केला जात आहे.
पोलिस प्रशासनाने राबवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. येथील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी दादर सागरी पोलिस ठाण्याचे दोन ते तीन कर्मचारी आपली यशस्वी कामगिरी बजावत आहेत. आमच्या भागाला एक कार्यक्षम अधिकारी लाभल्याने आज येथील वाहतूक कोंडीचा महत्त्वाचा प्रश्न निकाली निघत आहे याचे समाधान वाटते. - दिलीप म्हात्रे, सरपंच - उर्णोली
गणेशोत्सव जवळ आला की या ठिकाणी वाहतूक कोंडी होणे हे नेहमीचेच असायचे, मात्र आजपर्यंत ही वाहतूक कोंडी दुर करण्यासाठी प्रयत्न झाले नव्हते ते या या पोलिस प्रशासनाने केले आहे. येथील वाहतूक कोंडी मुळे पुढील गावातील वाहन चालक आणि गणपती गाडीवाले यांच्यात शाब्दिक वाद होत होते. मात्र हे वाद देखील या सुरळीत वाहतूक कोंडीमुळे बंद झाल्याने समाधान व्यक्त केले जाते. - गोपीनाथ मोकल, स्थानिक गणपती कारखानदार, जोहे