-मधुकर ठाकूर
उरण : जागतिक ऐतिहासिक एलिफंटा बेटावर महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठ्याला पुन्हा एकदा नादुरुस्तीचे ग्रहण लागले आहे.समुद्रातील दुरुस्ती केलेला सबमरीन केबल्सच्या जाइंटच्या बिघाडामुळे एलिफंटा बेटवासियांवर मागील चार दिवसांपासून अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
ऐतिहासिक जगप्रसिद्ध एलिफंटा बेटाला वीजपुरवठा करणाऱ्या समुद्राखालील उच्च दाबाच्या पाच विद्युत वाहिन्या २१ मे २०२२ रोजी नादुरुस्त होऊन निकामी झाली होती.त्यामुळे बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर ही तीनही गावे अंधारात बुडली होती. त्यानंतर महावितरणच्या तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर समुद्रातील नादुरुस्त झालेल्या सबमरीन केबल्सच्या जाइंटची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर एलिफंटा बेटावरील वीजपुरवठा मोठ्या प्रयासाने सुरळीत सुरू झाला होता.
समुद्रातील दुरुस्ती झालेल्या सबमरीन केबल्सच्या एका जाइंटमध्ये पुन्हा एकदा बिघाड झाला आहे. यामुळे मागील चार दिवसांपासून एलिफंटा बेटवासियांवर पुन्हा एकदा अंधारात चाचपडण्याची पाळी येऊन ठेपली आहे.वीजपुरवठा खंडित होत असल्याने बेटावरील पाणी पुरवठा करणारे विद्युत पंप बंद पडले आहेत.यामुळे तीनही गावातील पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.त्याचबरोबर दररोजच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे लघु उद्योजक, व्यावसायिकांनाही अनेक समस्यांना सामोरं जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
याबाबत महावितरणकडे घारापुरी ग्रामपंचायतीने महावितरणचे कार्यकारी अभियंत्याकडे लेखी तक्रार केली असल्याची माहिती सरपंच मीना भोईर यांनी दिली.तर नादुरुस्त केबल्सची अथवा खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत आगाऊ माहिती महावितरणचे अधिकारी ग्रामपंचायतीला कधीच देत नाहीत.त्यांचा बेटावर कर्मचारीही राहात नसल्याने माहितीही उपलब्ध होत नाही . महावितरणच्या या गळथान कारभार आणि दुर्लक्षपणामुळेच एलिफंटा बेटवासियांवर मागील चारपाच दिवसांपासून अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली असल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.
समुद्राखालील सबमरीन केबल्सच्या जांइंटची युद्ध पातळीवर दुरुस्ती करण्यात आली होती.मात्र दुरुस्ती करण्यात आलेल्या केबल्सच्या जांइंटमध्ये पुन्हा एकदा बिघाड झाला आहे.यासाठी आवश्यक असलेले स्पेशल जाइंटचे मटेरियल उपलब्ध झाले आहे.जांइंट दुरुस्तीचे काम येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे.यामुळे पुढील आठवड्यात एलिफंटा बेटवासियांचा वीजपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.- देविदास बैकर. अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग