अलिबाग - पत्रकारांनी राजकीय पक्षासोबत हात मिळवणी करून पत्रकारिता न करता ती निरपेक्षपणे करणे आवश्यक आहे. पत्रकारांनी घेतलेला चिमटा हा चेष्ठेत न घेता त्यावर प्रत्यक्ष काम होण अत्यावश्यक आहे. तर तुमची पत्रकारीता यशस्वी होईल असे प्रतिपादन खासदार सुनिल तटकरे यांनी केले. रायगड प्रेस क्लबच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त श्रीवर्धन येथे पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे, जेष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, जेष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख, किरण नाईक, मनोज खांबे आदी उपस्थित होते.
प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बदलत्या प्रवाहाबरोबर आपण बदलले पाहिजे, तरच आपले अस्तित्व निर्माण करू शकतो असा सल्ला उपस्थित पत्रकारांना खासदार सुनिल तटकरे यांनी दिला. पत्रकारांच्या लेखणीतून अनेक प्रश्नांची वाट मोकळी करुन देण्यात येते. त्यामुळे पत्रकारांनी आपली सजकता कायम ठेवली पाहिजे. पत्रकारांच्या एका बातमीमुळे एखाद्याचे चांगले ही होऊ शकते, तर एखाद्या बातमीमुळे उद्ध्वस्त होऊ शकतो त्यामुळे गांभीर्य ओळखून बातमी देणे गरजेे असल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले.
पत्रकारांनी कॉपी पेस्ट न करता आपले वेगळेपण दाखवून देणे आवश्यक आहे. एक पत्रकार चार पेपरमध्ये काम करीत असेल तर त्याने चार पेपरसाठी वेगवेगळ्या अॅँगलची बातमी करून पाठविणे आवश्यक आहे. त्यामधून त्यांचे वेगळेपण दिसून येते. पत्रकारांनी पत्रकारीता करताना आपली पथ्य पाळून काम करण महत्त्वाचे असल्याचे जेष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
१९८६ साली लातुर मधुन सुरू केलेल्या पत्रकारितेतील अनेक उदाहरणे देऊन आठवणींना उजाळा दिला. २६/११ मुंबई ऑपरेशनवर नजर टाकीत त्यावेळी कशा पद्धतीने पत्रकारीता केली याची उदाहरणे देत, आपण आपले लिखाण कसे सुधारले पाहिजे याचे कानमंत्र जेष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित पत्रकारांना दिला. ते पुढे म्हणाले राजकीय पुढारी वा अधिकाऱ्यांच्या बातम्या न देता शोध पत्रकारिता करण्यावर अधिक भर द्यावा असा ही सल्ला दिला. तसेच जिल्ह्यातील पत्रकारांसाठी प्रशिक्षण शिबिर घेत, त्या शिबिराला आम्हाला बोलवा असे आयोजकांना सांगितले.
३२ वर्षाच्या कारकिर्दीत रायगड प्रेस क्लबचे कार्य हे वाखाणण्याजोगे आहे. मुंबई प्रेस क्लब नंतर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली रायगड प्रेस क्लब ही संघटना आहे. अशाच प्रकारे रायगडचा पत्रकार सक्षम झाला पाहिजे. संवाद क्रांतीमध्ये आपण टिकून राहण्यासाठी आपल्यामध्ये सतत अपडेटशन आलं पाहिजे. त्यासाठी लिखाणाची शैली बदलण ही गरजेचे असल्याचा सल्ला जेष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी दिला.
आचार्य अत्रे राज्यस्तरीय संपादक सन्मान दै. लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांना, जीवन गौरव सन्मान म्हसळ्याचे जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांना तसेच निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी स्मृती जेष्ठ पत्रकार सन्मान रेवदंड्याचे जेष्ठ पत्रकार अभय आपटे यांना देण्यात आला आहे.
रायगड प्रेस क्लबचे सन्मान पुरस्कार!प्रकाश काटतरे स्मृती निर्भीड पत्रकार सन्मान पुरस्कार अलिबागचे महेंद्र दुसार यांना, दिपक शिंदे स्मृती सिनिअर व्हिडिओ जर्नालिस्ट सन्मान पुरस्कार कोलाडचे मोहन जाधव यांना, ॲड. जनार्दन पाटील स्मृतीशोध पत्रकारिता सन्मान पुरस्कार कर्जतचे दीपक पाटील यांना, संतोष पवार स्मृती युवा पत्रकार सन्मान पुरस्कार खोपोलीचे काशिनाथ जाधव यांना, डॉ. सचिन पाटील स्मृती पत्रकारिता सन्मान पुरस्कार महाडचे इलियास ढोकले यांना, सावित्रीबाई फुले महिला पत्रकार सन्मान येथील न्यूज १८ लोकमतच्या स्नेहल पाटकर ( रोहा ), ॲक्टीव्ह व्हिडिओ जर्नालिस्ट सन्मान पुरस्कार पुनम धुमाळ, (माणगाव), सामाजिक कार्यकर्ता सन्मान पुरस्कार पेणचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांना जाहीर करण्यात आले. विशेष सन्मान श्रीवर्धनचे जेष्ठ पत्रकार विजय गिरी यांना तर रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे सन्मान श्रीवर्धनचे संतोष रेळेकर आणि रोह्याचे रवींद्र कान्हेकर यांना देण्यात आले.