वेधशाळेचा ‘मॅन्युअल टू डिजिटल’ प्रवास

By admin | Published: May 18, 2017 03:46 AM2017-05-18T03:46:01+5:302017-05-18T03:46:01+5:30

प्रत्येक गावाला, प्रांताला, जिल्ह्याला, राज्याला ऐतिहासिक वारसा व प्राचीन संस्कृती लाभलेली असते. नागरिकांना आपल्या प्रांताचा इतिहास, पुरातन संस्कृती, रु ढी-परंपरा

Journals 'manual to digital' journey | वेधशाळेचा ‘मॅन्युअल टू डिजिटल’ प्रवास

वेधशाळेचा ‘मॅन्युअल टू डिजिटल’ प्रवास

Next

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : प्रत्येक गावाला, प्रांताला, जिल्ह्याला, राज्याला ऐतिहासिक वारसा व प्राचीन संस्कृती लाभलेली असते. नागरिकांना आपल्या प्रांताचा इतिहास, पुरातन संस्कृती, रु ढी-परंपरा माहिती व्हाव्यात आणि इतिहासकालीन वस्तूंचा ठेवा जतन व्हावा या उद्देशाने संग्रहालयांची निर्मिती करण्यात आली.
संग्रहालयांची संकल्पना, संग्रहित केलेल्या ठेव्याची माहिती, नागरिकांना इतिहासातील घडामोडींची व ऐतिहासिक संशोधकांना अभ्यासपर माहिती मिळावी या उद्देशाने ‘इंटरनॅशनल काऊन्सिल आॅफ म्युझियम’ यांनी १८ मे १९७७ पासून १८ मे हा दिवस ‘जागतिक संग्रहालय दिन’ म्हणून साजरा करण्यास आरंभ केला. यंदाचा ‘जागतिक संग्रहालय दिन’ ४० वा आहे.
अलिबागमधील जागतिक कीर्तीच्या भूचुंबकीय वेधशाळेतील ‘मॅन्युअल टू डिजिटल’ अशा १९१ वर्षांच्या भूचुंबकीय संशोधन प्रवासाची साक्ष देणाऱ्या उपकरणांच्या संग्रहालयाने संग्रहालय या संकल्पनेस नवा आयाम मिळवून दिला आहे.
ऐतिहासिक दस्तावेज आणि साधनांचेच संग्रहालय असते असा काहीसा समज रुढ आहे. मात्र तब्बल ११३ वर्षांपूर्वी अलिबाग समुद्रकिनारी १९०४ मध्ये, भारतीय भूचुंबकीय संस्थेचे पहिले संचालक आणि जागतिक कीर्तीचे भूचुंबकत्व अभ्यासक फ्रामजी मूस यांनी अलिबाग भूचुंबकीय वेधशाळेची स्थापना केली आणि जागतिक पातळीवरील पृथ्वीच्या गर्भातील भूचुंबकीय हालचालींचा अनन्य साधारण असा अभ्यास येथे सुरू झाला. पृथ्वी ही स्वत: एक लोहचुंबक असून तिच्या उदरात लोहचुंबकीय शक्तीचा संचार सुरू असतो. या शक्तीचे संशोधन व आलेखन करण्याचे कार्य या वेधशाळेत अविरत चालू आहे.
खरेतर मच्छीमार व व्यापारी सागरी वाहतुकीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतील कुलाबा येथे १८२६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या तत्कालीन सरकारने कुलाबा वेधशाळेची स्थापना केली. परंतु मुंबई शहरात विजेचा सुरू झालेला वापर आणि विजेवर चालणाऱ्या ट्राम्स यांच्यामुळे भूचुंबकीय संशोधन कार्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊन नोंदींमध्ये त्रुटी निर्माण होऊ लागल्या. त्यावर मात करण्याकरिता १९०४ मध्ये ही वेधशाळा अलिबाग येथे आणण्यात आली. अलिबागमधील वेधशाळेने अनेक परिणामकारक निर्णय दिले आहेत.

अमेरिकेतील ‘वर्ल्ड डेटा सेंटर’ ला नोंदी पुरविणारे अलिबाग
जागतिक स्तरावर आवश्यक असणाऱ्या अवकाश हवामानाचे अचूक अंदाज देण्याचे काम करणाऱ्या अमेरिकेतील ‘वर्ल्ड डेटा सेंटर’ ला हे अंदाज बांधण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या, पृथ्वीच्या उदरातील भूचुंबकीय हालचालींच्या बिनचूक आणि क्षणाक्षणाच्या नेमक्या भूचुंबकीय नोंदी अखंड उपलब्ध करून देण्याचे अनन्यसाधारण काम करणारी अलिबाग येथील ‘अलिबाग भूचुंबकीय वेधशाळा’ आज जागतिक पातळीवर एकमेव आहे.

‘मॅन्युअल टू डिजिटल’ आगळे संग्रहालय
जागतिक भूचुंबकीय नोंदी आणि संशोधन अभ्यासप्रवास १८२६ ते १९०४ या काळात कुलाबा (मुंबई) येथे आणि तद्नंतर अलिबाग येथील भूचुंबकीय वेधशाळेत सुरू झाला आणि आजही सुरू आहे.
भूचुंबकीय संशोधन प्रवासास यंदा १९१ वर्षे पूर्ण होत आहेत. या १९१ वर्षांच्या अखंड प्रवासातून ‘मॅन्युअल टू डिजिटल’ अशा भारताच्या देदीप्यमान संशोधन विकास आणि प्रगतीचा इतिहास सांगणारे साऱ्या विश्वातील एकमेवाद्वितीय असे प्राचीन संशोधन उपकरणांचे संग्रहालय जन्मास आले आहे.
१९१ वर्षांमध्ये भूचुंबकीय नोंदी घेण्याच्या उपकरणांमध्ये देखील अनन्यसाधारण असे संशोधन शास्त्रज्ञांनी केले आणि जवळपास १० वर्षांच्या एका टप्प्यास नवे प्रगत व आधुनिक संशोधन उपकरण वापरात आले. नवे उपकरण वापरात आले तर जुने प्रत्येक उपकरण अलिबाग भूचुंबकीय वेधशाळेत त्यात्यावेळी मोडीमध्ये न काढता जाणीवपूर्वक जतन करून ठेवण्यात आले. आणि अशा जतन केलेल्या उपकरणांतूनच येथे आता मानव संचलित उपकरणे ते आताच्या आधुनिक संगणकीय डिजिटल उपकरणांचा ‘मॅन्युअल टू डिजिटल’असे संग्रहालय साकारले आहे.

अलिबाग प्रवास
अलिबाग भूचुंबकीय वेधशाळेतील ‘मॅन्युअल टू डिजिटल’ संग्रहालयातील ठेवा
- तब्बल २०० वर्षांच्या भूचुंबकीय नोंदी.
- १९०४ ते १९३६ या काळात वापरलेला ‘वॉटसन व्हॅरिटोमीटर’.
- १९३७ ते १९७४ या काळात वापरलेला ‘ला कोर व्हॅरिटोमीटर’.
- १९७५ पासून अखंड भूचुंबकीय नोंदी घेणारा ‘इझमिरान-कक व्हॅरिटोमीटर’.
- ‘अ‍ॅब्सोल्युट इन्स्टुमेंट’ म्हणून वापरला जाणारा ‘प्रोटॉन प्रिसीजन मॅग्नेटोमीटर (पीपीएम)’.
- व्हेक्टर प्रोटॉन प्रिसीजन मॅग्नेटोमीटर (व्ही.पी.पी.एम.)
- क्वार्डझ हॉरिझॉण्टल मॅग्नेटोमीटर (क्यू.एच.एम.).
- झीरो बॅलन्स मॅग्नेटोमीटर (बी. एम. झेड.).
- क्यू मॅग्नेटोमीटर नं.७
- डिक्लीनेशन इन्क्लीनेशन मॅग्नेटोमीटर (डी.आय.एम.).
- १८२६ ते १९०४ या काळात कुलाबा (मुंबई) येथे वापरलेली उपकरणे.

Web Title: Journals 'manual to digital' journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.