४० गावांचा प्रवास धोक्याचा
By admin | Published: December 22, 2015 12:35 AM2015-12-22T00:35:47+5:302015-12-22T00:35:47+5:30
तुडील खाडी पट्टा विभागातील अतिदुर्गम भागातील ४० गावचे ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून होडीचा प्रवास करून दासगाव बाजारासाठी येत आहेत.
दासगाव : तुडील खाडी पट्टा विभागातील अतिदुर्गम भागातील ४० गावचे ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून होडीचा प्रवास करून दासगाव बाजारासाठी येत आहेत. अन्य पर्याय नसल्याने जिवावर उदार होऊन प्रवास करावा लागत असल्याने येथील ४० गावातील ग्रामस्थांनी सावित्री खाडीवर दासगाव ते गोठे असा पूल बांधावा अशी मागणी केली आहे.
महाड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत असणारी ही खेडेगावे असून या गावात मोठ्याप्रमाणावर व्यापार उद्योग व्यवसाय आहे. तसेच शेकडो वर्षांपासून सुरू असलेला सुक्या मासळीचा आठवडी बाजारही येथे भरतो. तसेच येथे आठवडी बाजार ही भरण्यात येतो. या आठवडी बाजारासाठी तालुक्यातील तसेच अन्य तालुक्यातील जवळपास शेकडो गावे मासळी खरेदीसाठी येत असतात. तसेच पुरातन काळापासून दासगाव येथील बाजारपेठ प्रसिध्द आहे. या गावालगतच सावित्रीखाडी असून त्यापलिकडे जवळपास ४० अतिदूर्गम भागातील गावे आहेत. या गावांना शिवाजी महाराजांच्या काळापासून दासगाव बाजारपेठ नजीक असल्याने खाडीवर होडीने या गावातील ग्रामस्थ दासगाव बाजारपेठेला दैनंदिन, गृहोपयोगी, व्यवसायानिमित्त भेट देत असे. आजही मोठ्यासंख्येने या खाडीपलीकडील गावातील ग्रामस्थ होडीने प्रवास करून बाजारासाठी तसेच महामार्गाने अन्य ठिकाणी जाण्यासाठी दासगाव येथे येत असतात.
दासगावला लागूनच मुंंबई-गोवा महामार्ग गेला आहे. गोठे, तुडील, जुई कुंबले, रावढळ, नरवण, खुटील, आदिसते, नडगाव, वामणे, सापे व अन्य असे जवळपास ४० गावातील ग्रामस्थांना मुंबई-पुणे, रत्नागिरी, गोवा आदी शहरांकडे जावयाचे असेल तर होडीचा प्रवास करून दासगावात येतात, मात्र महामार्गावर येणे जवळ पडते. आजही जलवाहतूक करून दासगाव याठिकाणी खाडीपलिकडील या गावातील नागरिकांना अन्य शहरामध्ये जाण्यासाठी आंबेत, टोळफाटा किंवा महाड असा जवळपास १५ कि.मी.चा अंतर प्रवास करावा लागतो. अत्यंत जिकिरीचा व आर्थिक भुर्दंड देणारा दूरचा प्रवास आहे. याकरिता सावित्री खाडीवर दासगाव ते गोठे असा पूल झाल्यास या खाडी पलिकडच्या नागरिकांची फारमोठी गैरसोय दूर होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे. ४० गावातील नागरिकांची गेल्या कित्येक वर्षांपासून पुलाची मागणी असूनही सरकारने त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)