-जयंत धुळप, अलिबागघरी शेती आहे, मात्र पाणी नाही, पोट कसं भरायचे हाच प्रश्न. बिगारी काम आणि सेंटरिंंगचे काम सुरू केले, मात्र मुकादम दोन-दोन महिने पैसेच देत नाही. शेवटी गाव सोडून कुटुंबासह कोकणात आलो. पावसाळा संपल्यानंतर कोकणात देवांच्या मोठमोठ्या यात्रा भरतात. त्यात फुगे आाणि खेळण्यांचा धंदा करतो आणि कसेबसे पोट भरतो, अशी आपली जीवनकहाणी सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त उमदी गावातून बल्लाळेश्वराच्या माघी गणेशोत्सव यात्रेत व्यवसाय करण्यासाठी आलेल्या सुनील काळेने दिली.सह वर्षांपूर्वी दुष्काळ पडल्यावर कामधंदा, मजुरीचे काम मिळेल या आशेने काळे कुटुंब मुंबईत दाखल झाले. गोवंडीमध्ये सरकारच्या योजनेतून छोटेसे घरही मिळाले; पण कामधंदा नाही, खायचे काय, असा प्रश्न पडला. अखेर गोवंडीतील घर विकले. त्यातून आलेल्या पैशातून चायनीज खेळणी आणि फुगे घेऊन व्यवसाय सुरू केला. आता कोकणातील यात्रांमध्ये पारधी समाजातील १० - १२ जण मिळून व्यवसाय करीत असल्याचे काळे यांनी सांगितले. यात्रेच्या पूर्वी मुंबईतून चार ते १२ हजारांचा माल ते खरेदी करतात. एका यात्रेत तीन ते साडेतीन हजार मिळतात. कसाबसा खर्च भागत असल्याचे लखनदादा सांगतात.शासनाच्या पारधी समाजासाठी काही योजना आहेत, पण आम्ही पोटासाठी सतत फिरत असतो; गावात राहू शकत नाही. त्यामुळे योजनांचा लाभ घेता येत नाही. व्यवसायाकरिता सरकारने भांडवल देणारी योजना सुरू केल्यास पोटासाठी गाव सोडून बाहेर पडलेल्या शेकडो कुटुंबाना फायदा होईल, असे काळे सांगतात.पारधी समाजासाठी सांगली जिल्ह्यासाठी ४०० घरकुले मंजूर होती. त्यातील काही घरांचे जत तालुक्यात बांधकाम पूर्ण आहे. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात ४०, मिरज तालुक्यात १०८, जत तालुक्यात ३६६, तासगाव तालुक्यात १७, पलूस तालुक्यात ५, शिराळा तालुक्यात ४, आटपाडी तालुक्यात २७ अशी एकूण ५६७ पारधी कुटूंबे आहेत. परंतु दुष्काळ व अन्य कारणास्तव त्यातील अनेक कुटुंबे आपल्या गावात राहत नाहीत. या पारधी कुटुंबांची पोटासाठीची भ्रमंती थांबविणारी शासकीय योजना जोपर्यंत अमलात येत नाही तोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी माहिती या विषयातील अभ्यासक श्रमिक मुक्ती दलाचे राज्य समन्वयक सतीश लोंढे यांनी दिली.भटकंतीवरील पारध्यांचे सर्वेक्षण शक्यराज्यातील पारधी समाजाच्या पुनर्वसनाचा विषय अनेक वर्षांपासून रखडला आहे. पारधी समाज राज्यात अस्तित्वाने आहे, पण सरकारी नोंदीत कोठेही नाही. त्यांच्या समस्या, मागण्या प्रशासनासमोर असल्या तरी त्या सुटण्याचे मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून नाहीत. राज्यातील विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पारधी कुटुंबांचे सर्वेक्षण केल्यास नेमका तपशील समोर येऊन, त्यांच्या समस्या सोडविण्याचा नवा मार्ग सापडू शकेल, असा विश्वास पाली-सुधागड येथील जे. एन. पालीवाला महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. सुधीर पुराणिक यांनी व्यक्त केला आहे.आषाढ महिन्यात परतणार गावी पाली बल्लाळेश्वराची यात्रा आटोपून ही १० ते १२ पारधी कुटुंबे आता ठाणे जिल्ह्यातील बदलापूरकरिता रवाना झाली आहेत. त्यांनतर ही कुटुंबे महाड, चिपळूण आणि रत्नागिरी करत करत अखेरीस आषाढ महिन्यात आपल्या गावच्या मरूबाईच्या यात्रेस आपल्या गावी परतणार आहेत.
यात्रा बनल्या ‘त्यांच्या’ उदरनिर्वाहाचे साधन
By admin | Published: February 14, 2016 2:56 AM