कशेडी घाटाचा प्रवास आता नऊ मिनिटांत; बोगद्याचे काम वेगात; वेळेची होणार बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 11:37 PM2020-02-05T23:37:55+5:302020-02-05T23:38:08+5:30

खेड हद्दीतील ७५ टक्के काम पूर्ण

The journey to Kashedi Ghat is now nine minutes; Speeding tunnels; Time savings | कशेडी घाटाचा प्रवास आता नऊ मिनिटांत; बोगद्याचे काम वेगात; वेळेची होणार बचत

कशेडी घाटाचा प्रवास आता नऊ मिनिटांत; बोगद्याचे काम वेगात; वेळेची होणार बचत

Next

- प्रकाश कदम 

पोलादपूर : नैसर्गिकदृष्ट्या धोकादायक आणि त्यातच सातत्याने होणारे अपघात, अवजड व रसायनवाहू वाहनांची डोकेदुखी यामुळे खडतर झालेला मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील प्रवास आता आरामदायी व कमी वेळेचा होणार आहे. या घाटात आता बोगदा बांधण्याचे काम वेगाने सुरू असून, रायगड हद्दीतील कामही सुरू झाले आहे. जवळपास खेड हद्दीतील ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या बोगद्यामुळे वाहनचालकांना वळणावळणाच्या घाटातून गाडी नेण्याचीही कसरत करावी लागणार नाही. शिवाय, ४० मिनिटांच्या या प्रवासाचे हेच अंतर केवळ नऊ मिनिटांत कापता येणार आहे. सद्यस्थितीत बोगद्याचे काम रायगड हद्दीत सुरू करण्यात आले असून, कामतवाडी येथील डोंगर पोखरण्यात येत असून, या मार्गावर मोठ्या प्रमाणावर डम्परसह अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असल्याने येत्या वर्षभरात काम पूर्ण होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

तत्कालीन रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते २६ जानेवारी २०१९ रोजी कामाचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीत करण्यात आला. मुंबई-गोवा महामार्गाच्या इंदापूर ते कशेडी या दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. याच मार्गावर पोलादपूर ते खवटी असा कशेडी घाट आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा घाट महत्त्वाचा; पण तितकाच धोकादायक मानला जातो. तो पार करण्यासाठी वाहनांना ४० मिनिटांचा कालावधी लागतो. या घाटातून प्रवास करताना वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. तर रसायनवाहू वाहने घाटात कलंडल्याने वाहतूककोंडी झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. पर्यटकांबरोबरच गणेशोत्सव व शिमगोत्सवात येथे मोठी वाहतूककोंडी होत असते.

केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या बोगद्यासाठी सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर बोगद्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीला देण्यात आले आहे. या कामासाठी ५०२.२५ कोटी रुपये खर्च येणार असून, पावणेदोन किलोमीटरचे एकदिशा मार्गाचे वाहतुकीसाठी दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत. बोगद्यामध्ये जाण्यासाठी तीन व येण्यासाठी तीन अशा एकूण सहा लेन असतील. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर त्या रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी चार वर्षे ठेकेदारांवरच राहणार आहे. कशेडी बोगदा हा चौपदरीकरणातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका हद्दीत भोगाव गावाजवळ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या कशेडी हद्दीत बोगद्यांचे काम वेगात सुरू आहे.

दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू

1. चोळई गावापासून धामणदेवी गावापर्यंत सहा किलोमीटर अंतराच्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चौपदरीकरणाच्या कामासाठी दरी व डोंगराच्या बाजूला ठेकेदार कंपनीमार्फत रस्ता तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते खवटी गाव असे चौपदरीकरणाच्या दुसºया टप्प्याचे काम सुरू असून, रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा घाटमार्ग महत्त्वाचा मानला जातो.

2. चोळई गाव हद्दीत सुरू होणारा हा घाटमार्ग नागमोडी अवघड वळणाचा, तीव्र चढ-उताराचा आणि एका बाजूला खोल दरी व दुसºया बाजूला डोंगर असा असून ४० किलोमीटर अंतराचा आहे. या घाटात सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात. आतापर्यंत हजारो प्रवाशांंनी जीव गमावले असून, कित्येकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे.

3. या घाटमार्गावर दिवसरात्र हजारो वाहनांची वर्दळ असते. एखादे अवघड वाहन ऐनघाटात बंद पडले तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प होते. दिवस असो की रात्र, ऐन जंगलामध्ये चार-पाच किलोमीटरपेक्षाही अधिक वाहनांच्या उत्तर-दक्षिण दोन्ही बाजूला रांगा लागतात आणि तासन्तास प्रवासी अडकून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

4. विशेषत: पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात, तसेच मागील दहा वर्षांपासून भोगाव खुर्द गाव हद्दीत रस्ता चार-पाच फूट दरवर्षी खचत आहे. मात्र, आता नवीन चौपदरी मार्ग कशेडी घाटातील धामणदेवी फाट्याजवळील दत्तवाडीजवळ खाली उतरला असून, डोंगरपायथ्याशी असलेल्या भोगाव खुर्द आणि भोगाव बुद्रुक गावाजवळून जात असल्याने पावसाळ्यात या दोन गावांच्या हद्दीत कोसळणाºया दरडीचा धोका टळणार आहे.

दोन्ही बोगद्यांचे काम प्रगतिपथावरकशेडी घाटातील दोन्ही बोगद्याचे काम सुरू असून, आतापर्यंत अंदाजे ४०० मीटरपर्यंतचे काम झाल्याचे दिसते.या बोगद्यामध्ये जाण्यासाठी तीन आणि येण्यासाठी तीन अशा सहा लेन असणार आहेत, तसेच आपत्कालीन व्यवस्था असणार आहे.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून बोगद्याचे काम करण्यासाठी दोन-तीन वर्षे सर्वेक्षण करण्यात येत होते, असे भोगाव बाजूकडील बोगद्याजवळ असलेल्याकामतवाडीमधील ग्रामस्थ सांगतात. रिलायन्स इन्फास्ट्रक्चर्स कंपनी हे काम करत असून, पावणेदोन किलोमीटर लांबीचे हे बोगदे आहेत.

Web Title: The journey to Kashedi Ghat is now nine minutes; Speeding tunnels; Time savings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.