जेएसडब्ल्यूची १२० मीटर लांबीची जलवाहिनी उखडली
By admin | Published: December 7, 2015 01:15 AM2015-12-07T01:15:43+5:302015-12-07T01:15:43+5:30
मुंबई - गोवा महामार्गालगत डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीने १२० मीटर लांबीची दोन मीटर रु ंद आणि एक मीटर उंचीची जलवाहिनी टाकली होती
नागोठणे : मुंबई - गोवा महामार्गालगत डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीने १२० मीटर लांबीची दोन मीटर रु ंद आणि एक मीटर उंचीची जलवाहिनी टाकली होती. ही जागा वनखात्याच्या अंतर्गत येत असल्याने नागोठणे वन कार्यालयाचे वनक्षेत्रपाल बी. व्ही. पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार धडक मोहीम हाती घेत संबंधित जलवाहिनी उखडून टाकण्याच्या कामास प्रारंभ केला. ही मोहीम लवकरच पूर्ण होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
डोलवी (ता. पेण) येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने मुंबई - गोवा महामार्गालगत नागोठणे के. टी. बंधारा ते डोलवी अशी नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. महामार्गालगत १२० मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुद्धा चालू असल्याने त्यासाठी वनखात्याच्या ताब्यातील काही जागा केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महामार्गाच्या कामासाठी देण्यात आली आहे. इतर कोणतेही वनेतर काम करता येणार नसल्याचे वनखात्याकडून त्यावेळी महामार्ग खात्याला सूचित करण्यात आले होते. मात्र, आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता जेएसडब्ल्यू कंपनीने महामार्ग प्राधिकरणाशी अंतर्गत तडजोड करीत संबंधित जागेत जलवाहिनी टाकण्याचा प्रयत्न केला होता.
कायद्याचा भंग केल्यामुळे २६ जून २०१५ ला कंपनीवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला असल्याचे वनक्षेत्रपाल बी. व्ही. पाटील यांनी सांगितले.
नागोठणे परिक्षेत्र हद्दीतील गट क्र मांक दोन अ / एक ब एक या जागेतून जेएसडब्ल्यू कंपनीने जलवाहिनी टाकली आहे. या जागेत वनेतर कामास बंदी असून सेक्शन ३५ लागले आहे व त्यामुळेच वनक्षेत्रपाल आर. एच. पाटील यांनी रोहे न्यायालयात दावा दाखल केला होता, मात्र कंपनीवर कोणतीही कारवाई न करता वनखात्याकडून कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता असे मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी, अमोल पेणकर यांनी ४ आॅगस्ट २०१५ च्या पत्रान्वये उप वनसंरक्षक, रायगड, अलिबाग यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, असे असूनही वनखात्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या निषेधार्थ उपोषणाचा इशारा दिला व त्यानंतरच वनखात्याने कारवाईचे हत्यार उगारले असे पेणकर यांनी सांगितले.
या धडक कारवाईत वनखात्याच्या फिरती पथकाचे सहाय्यक वनसंरक्षक चव्हाण आणि मसुरकर, नागोठणे वनक्षेत्रपाल बी. व्ही. पाटील, वनपाल केळुसकर यांच्यासह कार्यालयातील २२, पाली कार्यालयाचे १० कर्मचारी आणि वनखात्याच्या ठाणे विभागाचे राज्य सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक लहुराज साबणे यांच्यासह २० जवानांचे पथक या मोहिमेत सहभागी झाले आहेत. (वार्ताहर)