जे एस डब्लू कंपनीचा मालवाहू बार्ज भरकटला, कुलाबा किल्ल्याच्या बाजूला टाकला नांगर
By राजेश भोस्तेकर | Published: July 25, 2024 04:45 PM2024-07-25T16:45:48+5:302024-07-25T16:46:13+5:30
बोटीचा नांगर टाकून सध्या बोट ही समुद्रात थांबविण्यात आलेली आहे.
अलिबाग ::रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान विभागाने दिल्याने मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. समुद्रही खवळलेला असल्याने अलिबाग येथून जयगड पोर्टवर माल घेऊन निघालेली जे एस डब्लू कंपनीची मालवाहू बार्ज भरकटल्याने कुलाबा किल्ल्याजवळ अडकला आहे. यात कोणतीही दुर्घटना घडलेली नसली तरी बार्ज आणि त्यातील अडकलेल्या १४ जणांना काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, कोस्ट गार्ड आणि कंपनी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू केले आहेत. बोटीचा नांगर टाकून सध्या बोट ही समुद्रात थांबविण्यात आलेली आहे.
अलिबाग येथून जे एस डब्लू कंपनीची मालवाहू बार्ज ही रत्नागिरी येथील जयगड पोर्टवर माल घेऊन गुरुवारी २५ जुलै रोजी सकाळी निघाली होती. जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट असल्याने रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच समुद्रही खवळलेला असून भरती आलेली आहे. या परिस्थितीत मालवाहू बार्ज हे कुलाबा किल्ल्याजवळ आले असता मुसळधार पाऊस आणि खवललेल्या समुद्राच्या लाटांच्यामध्ये अडकल्याने बार्ज भरकटू लागले. बार्ज चालकाने प्रसंगवधन दाखवून बार्ज किनाऱ्याकडे आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी झाला.
समुद्राला भरती ही असल्याने बार्ज हे भरकटून कुलाबा किल्ल्याच्या मागे अडकले. बार्जच्या इंजिन मध्ये पाणी गेले असल्याने अखेर चालकाने नांगर टाकून थांबवले आहे. जयगड पोर्ट प्रशासन, कोस्ट गार्ड हे संपर्कात आहेत. बार्ज मध्ये १४ जण कर्मचारी असून सर्व सुखरूप आहेत. त्यांना सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जे एस डब्लू प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनीही अलिबाग समुद्रकिनारी येऊन पाहणी केली असून संबंधितांना याबाबत सूचना केल्या आहेत.