जे.टी.एल.ला माणगाव तहसीलदारांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:50 AM2018-02-23T02:50:16+5:302018-02-23T02:50:16+5:30
तालुक्यातील कोस्ते येथील जे.टी.एल. कंपनीला माणगाव महसूल खात्याकडून ५६ लाखांचा दंड आकारला आहे. हा दंड कंपनीने केलेल्या कामामध्ये रॉयल्टी बुडविल्याने आकारला आ
माणगाव : तालुक्यातील कोस्ते येथील जे.टी.एल. कंपनीला माणगाव महसूल खात्याकडून ५६ लाखांचा दंड आकारला आहे. हा दंड कंपनीने केलेल्या कामामध्ये रॉयल्टी बुडविल्याने आकारला आहे. जे.टी.एल. इन्फ्रा लि. कंपनीकडून लोखंडी पाइप बनविण्याचा औद्योगिक कारखाना उभारला जात आहे. निजामपूर ग्रामपंचायतीने २१ डिसेंबर २०१७ रोजी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द केले आहे. या कंपनीने निजामपूर ग्रामपंचायतीकडे काम सुरू होण्यापूर्वी कोणतीही कागदपत्रे सादर न केल्यामुळे निजामपूर येथील ग्रामस्थांनी २६ जानेवारी २०१८ रोजी जे.टी.एल. कंपनीला कोणत्याही खात्याला परवानगी मिळू नये यासाठी सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने ठराव मंजूर केला आहे.
जे.टी.एल. कंपनीचे काम कोस्ते येथे सुरू केले अशी माहिती सुधीर पवार व सरपंच हमजा जळगावकर तसेच ग्रा.पं. सदस्य यांनी प्रसिद्धिपत्रकामध्ये दिली असून त्यांनी कोस्ते बुद्रुक गावच्या हद्दीत जे.टी.एल. कंपनीचे काम सुरू असून औद्योगिक एन.ए. नसणारी जागा एन.ए. दाखवून कंपनीचे काम सुरू आहे असे म्हटले आहे. तसेच निजामपूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत गवंड रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांना नदीच्या पाण्याकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने गुरांना पाणी पिण्यासाठी वांदे झाले आहेत. तसेच पंचायतीची पाणी योजना याच रोडलगत आहे. यामुळे नाहक त्रास येथील नागरिकांना होत आहे. या कंपनीने काम बंद नाही केले तर सुधीर पवार, सरपंच हमजा जळगावकर व ग्रा.पं. सदस्य २१ मार्च रोजी उपोषण करणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली.
तसेच निजामपूर ग्रामपंचायतीने महसूल, वन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाणीपुरवठा, महावितरण विभाग, जलसंपदा विभाग अशा अनेक ठिकाणी या कंपनीविरोधात लेखी अर्ज दिले आहेत. तसेच ही कंपनी काळ नदीलगत असल्याने या जे.टी.एल. कंपनीच्या सांडपाण्यामुळे पाणी प्रदूषित होईल. नदीचे पाणी प्रदूषित झाल्यास शेकडो गावे पाण्यावर अवलंबून असल्याने भविष्यात पाण्याचे गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता आहे.