न्यायाधीशांमधील वादामुळे न्याय व्यवस्थेला धोका-निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:57 AM2018-01-15T00:57:17+5:302018-01-15T00:57:29+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमधील वाद चव्हाट्यावर येणे ही अत्यंत गंभीर बाब असून, या वादांमुळे न्यायव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली
महाड : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमधील वाद चव्हाट्यावर येणे ही अत्यंत गंभीर बाब असून, या वादांमुळे न्यायव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. अजित फायटर्स क्लबच्या वतीने महाडमधील आजाद मैदानावर अॅड. उज्ज्वल निकम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.
अनेक वर्षांपासून असंख्य खटल्यात सरकारी वकील म्हणून काम करीत आहे. मात्र, १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट आणि २६ /११ चा मुंबई दहशतवादी हल्ला या दोन महत्त्वाच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम करताना एक मोठे आव्हान होते. मात्र, दोन्ही खटल्यातील आरोपींवरील आरोप न्यायालयात पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवले. कायदा सर्वांनाच समान आहे, न्यायालयाचा आदर आणि प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे. न्यायालयाचा अनादर झाला तर लोकशाही तत्त्वाला तडा जाईल आणि सर्वत्र अराजकता माजेल, अशी खंत अॅड. निकम यांनी व्यक्त केली.
भारतीय राज्यघटना ही संपूर्ण जगात आदर्श मानली जाते. या घटनेची पायमल्ली केली जात असेल तर त्या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. न्यायालयाची शिस्त, औचित्य याला तडा जाऊ देता कामा नये, त्यालाच सुरुंग लावला जात असेल तर देशाच्या अस्थिरतेला धोका पोहचू शकतो आणि देशाच्या लोकशाहीलाही अत्यंत घातक असल्याचेही अॅड. निकम यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात नगराध्यक्षा स्नेहल जगताप, अर्बन बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत, अजित फायटर्सचे अध्यक्ष अशोक भिलारे आदी उपस्थित होते.