कळंबोलीत पोस्टाच्या भूखंडांवर वाढले जंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:58 AM2017-12-07T00:58:52+5:302017-12-07T00:58:52+5:30
कळंबोली वसाहतीत भव्य-दिव्य स्वरूपाचे पोस्ट कार्यालय उभारण्यात येणार आहे. त्याकरिता सिडको कार्यालयाच्या समोरचा चार हजार चौरस मीटरचा भूखंड दिला आहे.
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : कळंबोली वसाहतीत भव्य-दिव्य स्वरूपाचे पोस्ट कार्यालय उभारण्यात येणार आहे. त्याकरिता सिडको कार्यालयाच्या समोरचा चार हजार चौरस मीटरचा भूखंड दिला आहे. ही जागा पोस्ट खात्याकडे हस्तांतरित केली आहे. त्याचबरोबर येथे
अतिक्रमण होऊ नये, या उद्देशाने बाजूला संरक्षण भिंत घालण्यात आली आहे; परंतु येथे आता गवत, झाडे-झुडपे वाढल्याने एक प्रकारे जंगल तयार झाले आहे. या ठिकाणी नव्याने इमारत कधी बांधणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
कळंबोली नोड सिडकोने सर्वातअगोदर विकसित केला. सुरुवातीला येथे फक्त सिडकोच्या इमारती होत्या. त्यानंतर खासगी बांधकाम व्यावसायिकांनी इमारती बांधल्या. रोडपाली परिसर जवळपास विकसित झाला आहे. त्यामुळे या नोडची लोकसंख्या वाढली आहे. यामुळे येणारे टपाल, मनिआॅर्डर, बिल तसेच इतर पोस्टाची कामे वाढली आहेत. फायरब्रिगेडजवळ असलेले सध्याचे कार्यालय अपुरे पडत आहे. येथे जागा कमी असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सिडकोने शहर नियोजनामध्येच पोस्टाकरिता भूखंड राखीव ठेवला होता. या जागेची मागणी पोस्ट खात्याकडून करण्यात आली. या भूखंडाची रक्कम अदा करण्याबरोबर इतर सोपस्कार बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे ही जागा पोस्टाच्या ताब्यात दिली गेली; परंतु बाजूलाच नाल्याला लागून असलेल्या भूखंडावर अनधिकृत झोपड्या बांधून अतिक्र मण झाले आहे. भविष्यात या जागेवरही अशाच प्रकारे अतिक्रमण करण्यात आले तर त्यांच्यावर कारवाई करणे मोठे आव्हान ठरेल. यामुळे सहा महिन्यांपूर्वी ठेकेदार नियुक्त करून चारही बाजूने संरक्षित भिंत घालण्यात आली. तसेच आतमध्ये कोणीही प्रवेश करू नये, यासाठी गेट बसविण्यात आले आहेत. सुरक्षारक्षकाला बसण्यासाठी एक चौकीही प्रवेशद्वारावर करण्यात आली आहे. येथे अत्याधुनिक स्वरूपाचे कार्यालय बांधण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पार्किंगसह इतर सुविधा देण्यात येणार आहेत; परंतु याबाबत वेगाने हालचाली होताना दिसत नाहीत. या संदर्भात पनवेल येथील अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रि या मिळू शकली नाही.