जंगल जेट्टीमुळे पर्यटकांच्या रेलचेलीमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 12:10 AM2019-05-02T00:10:22+5:302019-05-02T00:11:10+5:30
प्रवास सुखकर : तालुका, जिल्हे एकमेकांना जोडले गेले
संजय करडे
मुरूड : वाढत्या औद्योगिकीकरणामुळे अंतर्गत दळणवळणाच्या साधनांना खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या जलमार्गाचे जाळे एकमेकांना जोडण्यावर शासन अधिक भर देत आहे. सध्या महागाईत प्रचंड वाढ झाल्याने सर्वच ठिकाणी पूल बांधणे शासनास अशक्य झाले आहे. एका पुलासाठी त्याच्या अंतरानुसार किमान दोनशे ते तीनशे कोटी रुपयांचा खर्च येत असतो. अशा वेळी असा खर्च करणे सर्वच ठिकाणी कठीण बाब आहे. दोन तालुके अथवा जिल्हे जोडण्यासाठी जंगल जेट्टी हा उत्तम पर्याय बनला आहे. यामधून ट्रक, एसटी, लहान चारचाकी वाहने व लोकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक अगदी सुलभपणे करता येते.
या जंगल जेट्टीमुळे मुरुड तालुक्यातील आगरदांडा तर श्रीवर्धन तालुक्यातील दिघी ही गावे जोडली गेली. तसेच श्रीवर्धन तालुक्यातील बाणकोट खाडी ते रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास ही गावे जोडली गेल्याने रायगड व रत्नागिरी जिल्हे एकमेकांना जोडले गेले आहेत. त्यामुळे जंगल जेट्टी वरदान ठरत आहे.
मुरुड तालुक्यातील आगरदांडा येथून जंगल जेट्टीमुळे नागरिकांच्या चारचाकी गाड्यांसह दुचाकी वाहनांची अगदी सहज वाहतूक होऊन प्रवास करणे सोपे जात आहे. पुणे येथून येणारे पर्यटक दिवेआगर व श्रीवर्धन येथून तो मुरुड येथे सुद्धा येऊन आता वस्ती करू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढवण्यात जंगल जेट्टीचे सुद्धा सहकार्य लाभत आहे. या जंगल जेट्टीमुळे रत्नागिरी, पुणे व कोल्हापूर येथील पर्यटकांना या भागात येणे सोपे झाले आहे. पूल झाला नसला तरी जंगल जेट्टीमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
वेळ आणि पैशाची होतेय बचत
सागरी किनाऱ्यावर वसलेली गावे; परंतु खाडीचा परिसर असल्याने दळणवळणाच्या साधनात येणारा व्यत्यय पार करत जंगल जेट्टीद्वारे विकास करण्यास मदत होत आहे. रस्त्याने रत्नागिरीचे अंतर अधिक आहे, परंतु तेच जंगल जेट्टीचा वापर केल्यास हे अंतर खूप कमी पडून इंधनाची व वेळेची सुद्धा बचत होत आहे.
प्रत्येक तालुक्याचे अंतर कमी होऊन तालुके एकमेकांना जोडले जाऊन वाहतूक अंतर कमी होत आहे. तालुके एकमेकांना जोडल्यामुळे जिल्हे सुद्धा जवळ आले आहेत.जंगल जेट्टीमुळे महाराष्ट्र शासनाच्या मेरीटाइम बोर्डास प्रत्येक प्रवाशामागे लेवी कराद्वारे भरघोस उत्पन्नसुद्धा मिळत आहे. पर्यटक व स्थानिक नागरिक यांना प्रवासाचे उत्तम साधन मिळून प्रवास हा जवळचा बनला असून बहुसंख्य पर्यटक आता जंगल जेट्टीद्वारे प्रवास करताना दिसत आहेत.