उरण : स्वातंत्र्य संग्रामातील चिरनेर जंगल सत्याग्रहात हौतात्म्य पत्करलेल्या आठ हुतात्म्यांची स्मारके उरण परिसरात उभारण्यात आली आहेत. अनेक स्मारकांच्या छताची सिमेंटची पत्रे फुटल्याने छतालाच गळती लागली आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे स्मारकांची दुरवस्था झाली असून, मात्र हुतात्मा स्मारके उकिरडेच बनली आहेत. स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलनांतर्गत देशभरात आंदोलने सुरू होती. इंग्रजांना भारत छोडोचा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता. त्याचवेळी चिरनेर येथेही २५ सप्टेंबर १९३० साली जंगल सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले होते. शांततामय रीतीने सुरू असलेल्या जंगल सत्याग्रहात हजारो आंदोलक सहभागी झाले होते. जंगल का कायदा तोड दिया, इंग्रज भारत छोडोचा नारा देत आक्कादेवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात आठ हुतात्मा धारातीर्थी पडले, तर अनेक जण जखमी झाले.स्वातंत्र्य लढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रह हा लढा देशभरात प्रसिद्ध आहे. या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या धाकू फोफेरकर, नवश्या कातकरी (चिरनेर), रामा कोळी (मोठी जुई), हसुराम घरत (खोपटे), रघुनाथ न्हावी (कोप्रोली), परशुराम पाटील (पाणदिवे), आनंदा पाटील (धाकटी जुई), आलू म्हात्रे (दिघोडे) उरण या उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांची स्मारके शासनाने परिसरात उभारली आहेत. स्वातंत्र्य संग्रामातील या महत्त्वाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे सर्वांनाच स्मरण व्हावे आणि हुतात्म्यांना स्मृती कायम तेवत रहावी, यासाठी उरण परिसरात हुतात्म्यांच्या मूळ गावी शासनाने स्मारके उभारली आहेत. मात्र बहुतांश स्मारकांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक हुतात्मा स्मारकांच्या छताची सिमेंटची पत्रे फुटली आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याने छताला गळती लागलेली दिसत आहे. त्यामुळे स्मारकात पाणी साचून दुर्गंधी पसरत आहे. स्मारकांचा वापर मुतारी, शौचालय, कपडे, मासळी सुकविण्यासाठी आणि शेतीची अवजारे ठेवण्यासाठी होऊ लागला आहे. शासनाकडून देखभाल, दुरुस्तीसाठी निधी नसल्याची ओरड केली जाते. दरवर्षी हुतात्मा स्मृतिदिन साजरा करण्यासाठी रायगड जि. प. मार्फत येणारा पावणे दोन लाखांचा निधी ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला जातो. मात्र कोणत्याही ग्रा. पं. नी अद्याप तरी स्मारकांची झालेली दुरवस्था अथवा स्मारकांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविलेलाच नसल्याची माहिती उरण पंचायत समितीच्या अधीक्षक एम. डी. फड यांनी दिली.
चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा स्मारकांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 1:47 AM