म्हसळा : म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील देखील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने या मार्गावर प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. वाहनचालकांना खूप मोठी कसरत करावी लागत असून, प्रवासीवर्ग या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करीत आहे.
म्हसळा बायपास रस्ता, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ते म्हसळा बस स्टँड, दिघी नाका ते पाचगाव आगरी समाज हॉल, रिक्षा स्टँड ते दिघी रोड अशा सर्वच मुख्य वाहतूक रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. तर काही ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत तर स्वातंत्र्यदिनी शिवसेना पक्षाच्या वतीने आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला होता. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याच्या कामाला दोन दिवसांपूर्वी सुरु वात केली; परंतु बांधकाम विभागाच्या खड्डे भरण्याच्या पद्धतीवर नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली आहे. खड्डे भरण्यासाठी लाल जांभा दगडाचे तुकडे व मातीचा वापर करण्यात येत आहे. खड्डे भरण्यासाठी खडी न वापरता जांभा दगड वापरल्याने या दगडांचा भुसा होऊन पुन्हा खड्डे पडत आहेत.
खड्डे भरण्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कोणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहत नसल्याने कामाचा दर्जा घसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लाल जांभा दगड व मातीमुळे खड्डे पुन्हा मोठ्या प्रमाणात उखडत असून पावसाच्या पाण्यामुळे सर्व रस्ते लाल झाले असल्याचे दिसत आहेत. खड्डे बुजविण्याच्या नावाखाली निकृष्ट काम बांधकाम विभागाकडून होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढत असून त्यांना आरोग्याच्या व्याधी जडत आहेत. म्हसळा शहरात शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी, दैनंदिन कामासाठी, बाजारहाट करण्यासाठी ग्रामीण भागातील येणारे नागरिक, बाहेरून येणारे पर्यटक, त्याचबरोबर म्हसळा शहारवासीयांवर खड्डे भरण्याची मेहरबानी करणाºया सार्वजनिक बांधकाम विभागावर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.