पाली तहसील कार्यालयावर कातकरी आदिवासींची धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 12:38 AM2019-12-10T00:38:50+5:302019-12-10T00:39:09+5:30
‘माणुसकीची भीक नको... हक्क हवाय’ घोषणांनी दणाणला परिसर
पाली : आदिवासीच्या उन्नतीसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी होत नसून शासनदरबारी त्यांना खूप खेटा माराव्या लागतात तर तेथील अधिकाऱ्यांकडून आदिवासीची खूप पिळूवणूक केली जात आहे. या सर्व बाबींच्या निषेधार्थ श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वाखाली सुधागडातील कातकरी आदिवासी बांधवानी सोमवारी पाली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो कातकरी आदिवसी बांधव सामील झाले होते. आदिवासी कष्टकरी ढोर नाय... माणूस हाय... माणूस हाय. माणुसकीची भिक नकों... हक्क हवाय... हक्क हवाय... रेशन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे...आशा घोषणानी आदिवासी बांधवानी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.
पाली पंचायत समिती येथून निघालेल्या या मोर्चात तालुक्यातून हजारो आदिवासी बांधव सामिल झाले होते. त्या नंतर हा मोर्चा थेट पाली तहसील कार्यालयावर धडकला. तेथे या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या प्रसंगी उपस्थित असलेले श्रमजीवी संघटनेचे राज्याचे सचिव बाळाराम भोईर आदी मान्यवरांनी आदिवासींवर होणाºया अन्याया विरोधात प्रशासनावर व सरकार विरोधात सडकून टीका केली. त्यानंतर आदिवासींच्या मागणीचे निवेदन पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांना देण्यात आले.
या निवेदनात रेशनींगबाबत समस्या, घराखालील जमिनी नावे करण्याबाबत, वन जमिनी समस्या सोडवण्याबाबत, नागरी सुविधा मिळणेबाबत, पोलिसांकडून होणाºया अन्यायाबाबत, आदिवासींच्या मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर रोखण्याबाबत आदी समस्यांची सरकार दरबारी तात्काळ दखल घेवून त्या मार्गी लावाव्यात अशी मागणी केली आहे.
याप्रसंगी पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, पाली वन क्षेत्रपाल समीर शिंदे, महावितरणचे जे.व्ही. पवार, श्रमजीवीचे राज्य सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हा सरचिटणीस संजय गुरव ,जिल्हा अध्यक्ष मारुती वाघमारे , तालुका सचिव योगिता दुर्गे आदींसह हजारो आदिवासी कातकरी समाज बांधव उपस्थित होते.
सुधागड तालुक्यातील विशेषता कातकरी आदिवासी समाज बांधव खूपच हलकीच्या परिस्थिती जीवन जगत आहेत. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही आमच्या यंत्रणेमार्फत लवकरच करू, तसेच त्यांना रोजगार देण्याकरिता प्रयत्न करू.
- दिलीप रायन्नावर, तहसीलदार, पाली.