कळंबोली - जेएनपीटी मार्गाला अनधिकृत पार्किंगचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:31 AM2018-12-11T00:31:25+5:302018-12-11T00:31:46+5:30
नवी मुंबईत सध्याच्या घडीला वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईची मोहीम अतिशय तीव्र करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अनेकांचे परवाने देखील रद्द करण्याची कारवाई वाहतूक पोलिसांच्या मार्फत करण्यात आली आहे.
पनवेल : नवी मुंबईत सध्याच्या घडीला वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईची मोहीम अतिशय तीव्र करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अनेकांचे परवाने देखील रद्द करण्याची कारवाई वाहतूक पोलिसांच्या मार्फत करण्यात आली आहे. वाहतुकीस शिस्त लागण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांच्या कारवाईचे स्वागत होत आहे. मात्र कळंबोली-जेएनपीटी मार्गावरच अवजड वाहने पार्क करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
कळंबोली सर्कल याठिकाणाहून दररोज हजारो अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. ही वाहने अनेकदा महामार्गावरच उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने वाहन चालक वाहनांच्या केबिनमध्ये अथवा कंटेनरमध्ये चूल पेटवून जेवण बनवताना दिसतात. कळंबोली-जेएनपीटी मार्गाच्या रुंदिकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता बदलण्यात आला आहे. पथदिवे नसल्याने रात्रीच्यावेळी वाहने उभी आहेत की चालू आहे, हे लक्षात येत नसल्याने चालक संभ्रमात असतात.
कळंबोली मॅकडोनाल्डसमोरील मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्रवासी वाहतूक होत असते. खासगी वाहनबंदी असताना देखील याठिकाणी बिनदिक्कतपणे उभी असतात. या मार्गावरील दोन लेन अनधिकृत वाहनांनी व्यापल्याने अपघाताचा धोका निर्माण होतो.
जिथे रस्त्याचे काम चालू नाही, तिथे ही वाहने थांबत असतात. अशा वाहनांवर आम्ही कारवाई करत असतो.
- अंकुश खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळंबोली वाहतूक पोलीस