कळंबोली हत्या प्रकरण : पतीच्या हत्येसाठी पत्नीने दिली २० लाखाची सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 06:00 PM2023-05-18T18:00:52+5:302023-05-18T18:01:14+5:30
याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी पत्नीसह दोघांना अटक केली असून ते तिच्या माहेरच्या परिचयातले आहेत.
नवी मुंबई : पैशासाठी पत्नीला नेहमी कटकट करून वाद घालणाऱ्या व्यावसायिकाची पत्नीने २० लाखाची सुपारी देऊन हत्या केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी पत्नीसह दोघांना अटक केली असून ते तिच्या माहेरच्या परिचयातले आहेत. पतीच्या निधनानंतर संपत्ती व खात्यातील रक्कम आपल्यालाच मिळणार असल्याचे सांगून तिने हत्येचा कट रचला होता.
कळंबोली सेक्टर ६ येथील उद्यानात ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जसपाल निस्तर सिंग खोसा (४८) यांचा मृतदेह आढळून आला होता. या हत्येचा उलगडा करत गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांच्या पत्नीसह इतर दोघांना अटक केली आहे. गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील, सहायक निरीक्षक प्रवीण फडतरे, संदीप गायकवाड, उपनिरीक्षक वैभवकुमार रोंगे, मानसिंग पाटील, दिलीप भंडे, हवालदार प्रशांत काटकर, रणजित पाटील आदींच्या पथकाने हि कारवाई केली आहे. हत्येची घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेकडून तपास केला जात असताना दोघा संशयितांची माहिती मिळाली होती. त्यावरून लोकमान्य टिळक टर्मिनल येथून दिल्लीला जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी जसपाल यांची पत्नी दलजित खोसा (३८) हिच्या सांगण्यावरून हत्या केल्याचीही कबुली दिली. त्यानुसार तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
पत्नी दलजित हिचे वागणे व इतर कारणांनी जसपाल यांनी तिला पैसे देण्याचे थांबवले होते. त्यावरून दोघांमध्ये सतत वाद सुरु होता. त्यामुळे दलजित हि पंजाबमधील माहेरी गेली असता तिथे तिने सुखजिंदर सिंग (२३) व एकम ओनकार सिंग (२९) यांच्यासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला होता. पतीची हत्या केल्यास २० लाख रुपये व पतीच्याच ट्रान्सपोर्ट व्यवसायात नोकरी देखील देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दोघेजण कळंबोली सेक्टर ६ येथील उद्यानात येऊन थांबले होते. त्याचवेळी दलजित हिने घरातील कुत्र्याला फिरून आणण्याच्या बहाण्याने पतीला तिथे पाठवले असता दोघांनी चाकूने वार करून पळ काढला होता.
स्वतःच्या मुलालाही दिली धमकी
पतीच्या हत्येप्रकरणी दलजित हिला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिच्या दोनपैकी एका मुलाने आईला केलेल्या कृत्याबद्दल जाब विचारला. यावेळी तिने नशीब समज तू वाचला असे वक्तव्य केल्याचे समजते. यावरून वेळ पडल्यास ती स्वतःच्या मुलांच्या देखील हत्येच्या तयारीत होती का ? असाही प्रश्न निर्माण होत आहे.