पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने कळंबोली जलमय
By वैभव गायकर | Published: July 7, 2024 03:42 PM2024-07-07T15:42:59+5:302024-07-07T15:45:29+5:30
पनवेलमध्ये 121 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यात समुद्रात भरती असल्याने पाण्याचा निचरा योग्य रित्या होऊ शकला नाही.
पनवेल - शनिवारी मध्यरात्रीपासुन सुरु असलेल्या जोरदार पावसाचा सर्वात जास्त परिणाम कळंबोली शहरात पहावयास मिळाला. रविवार दि.7 रोजी सकाळी 8 च्या सुमारास कळंबोली शहरात पाणी साचण्यास सुरुवात झाली. अनेक नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले तसेच रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी पाण्याखाली गेल्या होत्या.
काही तासातच पनवेलमध्ये 121 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यात समुद्रात भरती असल्याने पाण्याचा निचरा योग्य रित्या होऊ शकला नाही. त्यामुळे कळंबोली शहरात अनेक भागात पाणी साचल. केएल 2,4,5,6, आदींसह सेक्टर 1,2,4,5,6 बिमा कॉम्प्लेक्स ते कळंबोली पोलीस ठाणे परिसरात पाणी साचले. काही घरात देखील पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाल. कळंबोली मधील मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावर एनएमएमटी,बेस्ट च्या बस बंद पडल्या याचाच परिणाम वाहतुकीवर झाला. बस बंद पडल्याने या रस्त्यावरील चार चाकी गाड्या देखील पाण्यात अडकल्या.
शहरात 50 दुचाकी, 25 चारचाकी पाण्याखाली गेल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले.पावसाचा जोर 12 च्या सुमारास कमी होत गेल्याने साचलेले पाणी हळू हळू ओसरले.दरम्यान शहरात अर्धवट नालेसफाई व पावसाळ्याच्या तोंडावर हाती घेतलेल्या विकासकामांमुळे हि परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी केला.सत्ताधारी भाजपवर भगत यांनी यावेळी आरोप केले.
शहरात अनेक रस्त्याची आणि गटारांची कामे सुरु आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर ही कामे हाती घेतल्याने शहरात अनेक ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाली. या कामांचे टायमिंग चुकल्याची देखील चर्चा आहे. होल्डिंग पॉडमधील गाळ न काढल्यामुळे देखील पॉडची पाणी साठवणूक क्षमता कमी झाल्याने देखील शहरातील पाण्याच्या निचऱ्यावर परिणाम झाले.
2005 ची आठवण ताजी -
2005 च्या महापुराचा सर्वात जास्त फटका कळंबोली शहराला बसला होता.रविवारच्या पावसाने अनेक घरात पाणी शिरल्याने 2005 ची आठवणी ताज्या झाल्या असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
सीईटीपीचे दूषित पाणी रस्त्यावर -
तळोजा एमआयडीसी मध्ये देखील विविध ठिकाणी यावेळी पाणी साचले होते.एमआयडीसी मधील दूषित पाण्यावर प्रक्रिया केली जाते.या सीईटीपी केंद्रात देखील पाणी साचल्याने पूर्ण दूषित पाणी रस्त्यावर आले होते.
चार ते पाच तासातच 121 मिमी पाऊस पनवेल परिसरात पडले.त्यातच समुद्राला भरती असल्याने पाण्याचा निचरा होऊ शकला नसल्याने कळंबोलीत ही समस्या उद्भवली. मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यात आली आहेत. होल्डिंग पॉण्डची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने गाळ काढण्यात येईल.
- मंगेश चितळे (आयुक्त,पनवेल महानगरपालिका)