महाड (दासगाव) : महाड तालुक्यातील दासगाव या गावात पुरातन काळापासून काळभैरव व जोगेश्वरीचे मंदिर आहे. हे दोन्ही देवस्थान जागृत असल्याचे या परिसरात बोलले जाते. दरवर्षी हिंदू नवीन वर्ष गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या पहिल्याच सोमवारी या देवस्थानची जत्रा भरवण्यात येते. यंदा देखील ही जत्रा सोमवारी भरणार असून या उत्सवाला रविवारपासून सुरूवात झाली आहे. या जत्रेचे वैशिष्ट्य या गावातील तसेच परिसरातील सर्व जाती धर्माचे प्रामुख्याने मुस्लीम समाजातील नागरिक व महिला मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी होतात. रविवारी संध्याकाळी दासगावमधील डोंगरोलीची काळकाई, न्हावी कोंड येथील काळकाई, दासगांव वहूर सीमेवरील टाके करीत वाघशेमधील काळकाई, जुट्यामधील घाणे करून शंकराचे देवस्थान, मारुतीचे देवस्थान यांना मानपानाचे नारळ व विडा या मंदिराच्या वतीने देण्यात आला. याचबरोबर महत्त्वाचे मुस्लीम समाजाच्या दर्ग्याला देखील मानपानाचा नारळ व विडा देण्यात आला. दासगांव परिसरात देवस्थान म्हणून ओळखले जाणारे काळभैरव व जोगेश्वरीचे मंदिर आहे. शेकडो वर्षांपासून या देवस्थानची जत्रा उत्सव करण्याची परंपरा आजही कायम आहे. ही जत्रा सोमवारपासून सुरू होणार असून विविध पूजापाठ कार्यक्रम असे होत मंगळवारी सकाळी संपेल. या जत्रेनिमित्त अनेक दिवसांपासून मूर्तीची साफसफाई तसेच मंदिराला रंगरंगोटी तसेच सजावटीचे काम अनेक दिवसांपासून करण्यात आले.सोमवारी सकाळपासूनच दुकानांची गर्दी सुरू होते. करमणुकीचे साधन चक्री तसेच आकाशपाळणे देखील या जत्रेचे आकर्षण असतात. दुपारी काळभैरव व जोगेश्वरी मंदिरामध्ये पूजापाठ करून भैरवच्या मूर्तीचे मुखवटे प्रस्थापित करण्यात येतात. त्यानंतर नवस बोलणाऱ्यांच्या परंपरेला सुरुवात होते. दरवर्षी बोललेले नवस व पावन झाल्यानंतर फेडण्यासाठी लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होते. त्यानंतर परंपरेनुसार मंदिराशेजारी असलेल्या बगाराची लाट फिरवली जाते. ही लाट संध्याकाळी फिरवली जाते. ही लाट दासगांव बामणे कोंड या वाडीवरून दरवर्षी तयार करून आणण्यात येते. रात्री ९ वा. वाजल्यापासून वीर गोठे, बामणे, सव या गावातील पालख्या आणि काठ्या येतात. (वार्ताहर)
काळभैरव, देवीची आजपासून जत्रा
By admin | Published: April 18, 2016 12:33 AM