पनवेल : मागील अनेक दिवसांपासून कामोठेवासीयांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नव्याने सुरू असलेल्या बांधकामांना २४ तास पाणीपुरवठा केला जातो; मात्र जुन्या लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्यामुळे रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. सिडकोच्या मनमानी कारभाराचा निषेध करीत कामोठेवासीयांनी एकत्र येऊन शनिवारी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला निवेदन दिले.कोणतीही पूर्वकल्पना न देता सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने कामोठे परिसरात पाणीकपात सुरू केल्याचा आरोप रहिवाशांनी यावेळी केला आहे. शहरात काही वर्षांपासून २४ तास पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र गेल्या दोन-चार महिन्यांपासून अचानकपणे ५० टक्क्यांपेक्षा पाणीकपात सुरू करण्यात आल्याचे सेक्टर २० मधील साई आशिष सोसायटीमधील पदाधिकारी आशिष गायकर यांनी सांगितले. यासंदर्भात सिडकोच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे; तरीही पाणीटंचाई कायम राहिल्यास शहरातील रहिवाशांनी एकत्र येऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. (वार्ताहर)- शहरात यापूर्वी प्रत्येक फ्लॅटधारकाला प्रतिदिन २,००० लिटर पाणी मिळत होते. मात्र सध्याच्या पाणीकपातीमुळे ५०० लिटरपेक्षा कमी पाणी रहिवाशांना मिळत आहे. एकीकडे नव्या बांधकामांना २४ तास पाणी मिळत आहे, तर दुसरीकडे अनेक सोसायट्यांना कमी दाबाने अल्प पाणीपुरवठा होत आहे. शहरात अनेक ठिकाणी पंप लावून पाणी घेतले जात असल्यानेही पाणीटंचाईची समस्या उद्भवत असून, अशा पंपधारकांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.
पाण्यासाठी कामोठेवासी उतरणार रस्त्यावर !
By admin | Published: December 06, 2015 12:18 AM