- गणेश प्रभाळे दिघी : वनविभागाच्या ‘कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजने’च्या माध्यमातून श्रीवर्धन तालुक्यातील ‘काळिंजे’ गावाला वेगळी ओळख मिळाली आहे. येथील १९० हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या कांदळवनांमध्ये ‘मॅन्ग्रोज सेल’च्या ‘मॅन्ग्रोज फाउंडेशन’ अंतर्गत ‘निसर्ग पर्यटना’ला सुरुवात झाली आहे.
शासकीय योजना या बासनात गुंडाळण्यासाठीच तयार झाल्या आहेत, असा समज आता दूर झाला आहे. वनविभागाच्या ‘कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजने’च्या माध्यमातून श्रीवर्धन तालुक्यातील ‘काळिंजे’ गावाला वेगळी ओळख मिळाली आहे. येथील १९० हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या कांदळवनांमध्ये ‘मॅन्ग्रोव्ह सेल’च्या ‘मॅन्ग्रोज फाउंडेशन’ अंतर्गत ‘निसर्ग पर्यटना’ला सुरुवात झाली आहे. येथे असणाऱ्या गर्द हिरव्या कांदळवनात वाहणारी खाडी, स्थानिकांकडून होणारे मैत्रीपूर्ण आदरातिथ्य व जैविविधता यामुळे हे उत्तम पर्यटनस्थळ बनू पाहत आहे.
काळिंजे येथील कांदळवनातील जैवविविधता लक्षात घेता निसर्गाच्या संवर्धनाबरोबर स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी शाश्वत निसर्गपर्यटनाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये मॅन्ग्रोज बोट सफारी, मॅन्ग्रोज ट्रेल, कांदळवन रोपवाटिकेला भेट, जंगलातील व बेटावरील पक्षिनिरीक्षण, पारंपरिक मासेमारी व अँगलिंग, पंचक्रोशीतील आकर्षक स्थळांना भेट तसेच महाराष्ट्रात प्रथमच सुरू होणाऱ्या मॅन्ग्रोज कयाकिंगचाही समावेश आहे.
विशेष म्हणजे, काळिंजे निसर्गपर्यटनाचे काम येथील स्थानिक लोक पाहत असून, महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. गावातील लोकांना खास करून महिलांना प्रशिक्षक म्हणून तयार करण्यात आले आहे. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना ग्रामस्थच पर्यटकांचे मार्गदर्शक होणार आहेत. गावात येत्या काळात कांदळवन निसर्ग माहितीकेंद्र सुरू करणे विचाराधीन आहे. महिलांनी कांदळवन आणि त्यामध्ये आढळणाºया पक्ष्यांची अगदी शास्त्रीय नावांसह माहिती आत्मसात करून घेतली आहे.
कसे जाल?
काळिंजे गाव मुंबईपासून १९३ किलोमीटर आहे. नजीकचे रेल्वे स्टेशन माणगाव येथे आहे. श्रीवर्धनपासून १४ किलोमीटर तर श्री हरिहरेश्वर या धार्मिक पर्यटन स्थळापासून अगदी पाच किलोमीटर अंतरावर आहे.
काय आहे पाहण्यासारखे?
१९० हेक्टर परिसरात कांदळवनांच्या ११ प्रजाती असून, पाच संलग्न प्रजाती आढळून आल्या आहेत. काळिंजे खाडीच्या मध्यभागी असलेल्या बेटाभोवती कांदळवनांचे दाट आच्छादन आहे. बेटावर जुनी वस्ती, गुरांचे गोठे, आंबा-बोरांची झाडे, नारळ व सुपारीच्या बागा आहेत. विशेष म्हणजे, चारही बाजूने खाºया पाण्याने वेढलेल्या बेटाच्या मध्यभागी गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत.
शासनाच्या ‘मॅन्ग्रोज सेल’ या योजने अंतर्गत काळिंजे ग्रामपंचायतीमार्फ त या उपक्रमासाठी पाठपुरावा करण्यात आला. सध्या या चार दिवसांतच सुरू झालेल्या निसर्गपर्यटन उपक्रमाला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.- विक्रांत गोगरकर, अध्यक्ष, कांदळवन सहव्यवस्थापन कमिटी, काळिंजे
वनविभागाच्या ‘कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजनेच्या माध्यमातून काळिंजे येथे निसर्गपर्यटन राबविताना स्थानिकांकडून सहकार्य मिळत असल्याने पुढील पर्यटनवाढीस मदत होईल.- मिलिंद राऊत, वनक्षेत्रपाल प्रादेशिक, श्रीवर्धन.